प्रा. रामकृष्ण मोरे गेले, तेव्हापासून पिंपरी-चिंचवड काँग्रेसला वाली नाही. पक्षश्रेष्ठींचे शहराकडे लक्ष नाही. पक्ष जिवंत राहावा, याच्याशी त्यांना सोयरसुतक नाही. राज्यात आमची सत्ता आहे आणि मंत्री आहेत, असे कधीही जाणवत नाही, अशी ‘व्यथा’ शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने ते काँग्रेस सोडून ‘मोकळा श्वास’ घेण्याच्या मन:स्थितीत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णय न घेण्याच्या कार्यपध्दतीवर भोईरांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली असून शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्णयाशिवाय पडून असल्याचा फटका पक्षला बसणार असल्याचे जाहीरपणे नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत आहेत. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढू, असे सांगता येत नाही. योग्य वेळी निर्णय घेऊ. तथापि, कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभेच्या रिंगणात असू, असा सूचक निर्धार व्यक्त केला. भोईर म्हणाले, ३० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. पक्षात निष्ठावंतांना किंमत नाही. िपपरी प्राधिकरणाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. साडेबारा टक्के परताव्याचा विषय मार्गी लागत नाही. १५ वर्षांपासून आमची सत्ता आहे, असे कधी जाणवत नाही. कारण, पिंपरीत कुणी फिरकतच नाही. िपपरीतील निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. एकाच वेळी ४-५ स्वीकृत आमदार पुण्याला दिले जातात. कार्यकर्त्यांचा नेतेच अपमान करतात. राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही लढायचे. नेत्यांनी मात्र सोयीस्कर भूमिका घ्यायची. राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड आंदण दिले की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती असल्याचे भोईरांनी म्हटले आहे.

Story img Loader