लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली. जागावाटपाची स्थिती ‘जैसे थे’ राहील, असे मानून कामाला लागलेल्या भोईरांनी रविवारी निकटवर्तीयांसाठी घातलेले ‘सहस्रभोजन’ हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. गेल्या निवडणुकीत भोईर काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, राष्ट्रवादीने घडवून आणलेल्या बंडखोरीमुळे त्यांचा दारुण पराभव झाला होता. पुढे भोईरांची मावळ लोकसभा लढवण्याची तयारी होती. तथापि, मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिल्याने त्यांना संधी मिळू शकली नाही. त्याचवेळी, भोईर राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि त्यांना मावळसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता काँग्रेसकडे असलेल्या चिंचवड विधानसभेसाठी भोईरांनी शड्डू ठोकले आहेत. मागील पराभवाचे उट्टे काढण्याबरोबरच आमदार होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी भोईर कामाला लागले. रविवारी चिंचवड-प्रेमपार्क येथील निवासस्थानी त्यांनी निकटवर्तीयांचे स्नेहभोजन आयोजित केले, तेव्हा एक हजाराहून अधिक हितचिंतकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये चिंचवड विधानसभा क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचा भरणा होता. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुक उघडपणे कामाला लागलेले असतील. तथापि, निकाल काहीही असला तरी निवडणूक लढवणार, अशी ठाम भूमिका घेत भोईरांनी सहस्रभोजनातून आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. तथापि, पक्षपातळीवर त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: नव्याने पक्षात आलेल्या आझम पानसरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Story img Loader