ताऱ्याचा अंत झाल्यावर त्यातून ‘पल्सार’ हा स्वत:भोवती वेगाने फिरणारा घटक निर्माण होतो.. हा खगोलशास्त्रीय सिद्धांत शास्त्रज्ञांना ठाऊक आहे. पण पल्सारची निर्मिती होताना ती प्रत्यक्ष टिपण्याची अतिशय दुर्मीळ कामगिरी भारतीय दुर्बीण, संस्था आणि शास्त्रज्ञांच्या पथकाने करून दाखवली आहे.. पृथ्वीपासून तब्बल ४५०० प्रकाश वर्षे दूरवर असेलेल्या पल्सारची निर्मिती सुरू आहे. ती या पथकाने पुणे जिल्ह्य़ातील खोडद येथील ‘जाएंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या दुर्बिणीतून टिपली आहे.
जगात यापूर्वी केवळ दोन वेळा अशी घटना टिपण्यात यश आले होते. आताच्या घटनेचे वैशिष्टय़ असे की, ती भारतीय महादुर्बीण, भारतीय संस्था आणि भारतीय शास्त्रज्ञांनी टिपली आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेचे डॉ. जयंत रॉय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. त्यात याच संस्थेचे प्रो. जयराम चेंगालूर, ब्रिटनमधील डॉ. बेन स्ट्रापर्स, अमेरिकेतील डॉ. पॉल रे, डॉ. भासवती भट्टाचार्य यांचाही समावेश आहे.
‘पल्सार’ म्हणजे स्वत:भोवती अतिशय वेगाने फिरणारा खगोलीय घटक. ताऱ्याचा अंत झाल्यानंतर त्यांची निर्मिती होते. ते ताऱ्याचीच ऊर्जा वापरून गती प्राप्त करतात. खोडद येथील महादुर्बिणीतून निरीक्षण करत असताना या शास्त्रज्ञांना ४५०० प्रकाशवर्ष दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापासून पल्सारची निर्मिती होत असलेली दिसली. ही निर्मितीची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू झाली असून, ती पुढे काही वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे.
palsar450
ताऱ्यातून ऊर्जा मिळवून स्वत:ची गती वाढवणाऱ्या ‘पल्सार’चे चित्र. प्रचंड वेगाने फिरणाऱ्या (मध्ये चमकणाऱ्या) पल्सारपासून रेडिओ बीम व प्रचंड ऊर्जा असलेले वारे निर्माण होत आहेत. ते शेजारच्या ताऱ्याला (उजवीकडील) नष्ट करत आहेत.
(सौजन्य- ‘नासा’चे गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर)

Story img Loader