आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गटबाजीच्या राजकारणामुळे रखडलेली शहर कार्यकारिणी अखेर बुधवारी जाहीर झाली.

कार्यकारिणीतील नावांवरून पक्षपातळीवर प्रचंड धुसफूस, गटातटाचे राजकारण आणि मानापमान नाटय़ झाले. संघटन सरचिटणीस आणि युवक अध्यक्षाच्या नियुक्तीवरून आमदार-खासदारांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने झालेला तिढा सुटला, तेव्हाच कार्यकारिणीचा मार्ग सुकर झाला.

गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली कार्यकारिणी जाहीर करताना चार सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, नऊ चिटणीस, ५४ कार्यकारिणी सदस्य, १४ विविध आघाडय़ांचे अध्यक्ष अशा जवळपास १०० जणांचा समावेश करण्यात आला आहे. शहर सरचिटणीसपदासाठी खासदार अमर साबळे यांच्या शिफारशीवरून माउली थोरात, तर आमदार जगतापांच्या शिफारशींवरून सारंग कामतेकर यांची वर्णी लागली. पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी उमा खापरे यांचे समर्थक संजय मंगोडेकर व माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचे समर्थक प्रमोद निसळ यांनाही संधी मिळाली. संघटन सरचिटणीसपदावर दावा ठोकून असणारे संघ परिवारातील अमोल थोरात यांचा ऐनवेळी पत्ता कापण्यात आला. युवा मोर्चासाठी रवी लांडगे की संदीप कस्पटे असा ‘सामना’ रंगला होता. तथापि, आमदारांच्या आग्रहानुसार लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी खासदार साबळे यांच्या समर्थक शैला मोळक यांची फेरनिवड करण्यात आली. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद बोऱ्हाडे यांच्यावर भोसरी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीनिवास बढे, सुरेश चोंधे, विजय शिनकर, गंगाधर मांडगे, विनोद आहिरे, सुप्रिया चांदगुडे, दिलीप राऊत, संतोष बारणे, बाबू नायर, शिवाजी काटे, मोरेश्वर शेडगे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Story img Loader