भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिथे ही बैठक झाली, त्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे तीन दिवसांचे भाडे थकवण्यात आले होते. या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर थकबाकीचा विषय चर्चेचा झाला आणि ओशाळलेल्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने थकीत रक्कम जमा केली.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक २६ व २७ एप्रिलला चिंचवड नाटय़गृहात झाली होती, त्यासाठी पक्षाने तीन दिवस नाटय़गृह आरक्षित केले होते. त्याचे भाडे ७० हजार झाले होते. मात्र, दीड महिन्यानंतरही पक्षाने ते नाटय़गृहाकडे भरले नव्हते. या संदर्भात, ‘प्रदेश कार्यकारिणीसाठी कोटय़वधींचा खर्च; मात्र, ७० हजाराचे भाडे थकवले’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर सकाळपासूनच भाजप वर्तुळात खूपच चिडचिड झाली. पैसे वेळेत का भरण्यात आले नाहीत, यावरून काही जणांना झापाझापी करण्यात आली. सकाळपासून फोनाफोनी सुरू झाली आणि दुपारी भाडेदराचे ७० हजार रुपये नाटय़गृहात जमा करण्यात आले. या संदर्भात, सरचिटणीस प्रमोद निसळ म्हणाले, की आम्ही नाटय़गृहाचे भाडे भरणारच होतो. तेवढय़ात बातमी प्रसिद्ध झाली. नाटय़गृहाचे व्यवस्थापक भीमराव खाडे यांच्याकडे विचारणा केली असता, पैसे जमा झाल्याचे त्यांनी सांगितले, मात्र याची बातमी करू नका, अशी विनंती केली.

निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या एका नगरसेवकाने रामकृष्ण मोरे नाटय़गृहातच एका धार्मिक सप्ताहाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचे ३५ हजार रुपये भाडे झाले होते. मात्र, चार महिन्यांपासून ते भाडे भरण्यात आले नव्हते. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या थकबाकीची बरीच ओरड झाली, तेव्हा पक्षाने थकीत रक्कम भरली. त्याच वेळी संबंधित नगरसेवकानेही थकबाकी भरून विषय मिटवून टाकला.

Story img Loader