पिंपरी पालिकेतील कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस व ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी एका संयुक्त बैठकीत घेण्यात आला. एलबीटीमुळे उत्पन्न कमी झाले असल्याचे सांगत गेल्या वर्षी इतकीच रक्कम स्वीकारण्याची विनंती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली होती. तथापि, कर्मचारी महासंघ व पालिका पदाधिकारी वाढ मिळण्यासाठी आग्रही राहिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजाराने वाढ देण्यात आली.
महापौर मोहिनी लांडे, आयुक्त डॉ. परदेशी, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, विरोधी पक्षनेते विनोद नढे, महासंघाचे अध्यक्ष बबन िझजुर्डे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. गेल्या वर्षी ९ हजार रुपये सानुग्रह अनुदान होते. चालू वर्षांत उत्पन्नात घट होत असल्याने वाढ न घेता मागीलप्रमाणे रक्कम स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले होते. तथापि, महासंघाने व सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला. तथापि, त्यावर तोडगा काढण्यात आला. महासंघाने १५ हजाराची मागणी केली होती, त्यावर ११ हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच बक्षिसाची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले, अशी माहिती महापौर व पक्षनेत्यांनी दिली.

Story img Loader