पुणे-मुंबई महामार्गावरील सुरक्षिततेच्या बाबींची पूर्तता नसल्याने रखडपट्टी
मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या व प्रत्यक्षात सुरूच होऊ न शकलेल्या पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी रस्त्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. जवळपास ११ किलोमीटरच्या या मार्गावरील सुरक्षिततेच्या बाबींची पूर्तता झाली नसल्यामुळेच हा मार्ग सुरू करण्यात येत नाही. महापालिकेचे अधिकारी याकामी तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र, असे असतानाही ठरावीक दिवसांनंतर हा मार्ग सुरू होणार, अशी घोषणा केली जाते. आता जुलै-ऑगस्टचे नियोजन सुरू असल्याने ‘तारीख पे तारीख’चा खेळ कायम आहे.
पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात चार ठिकाणी बीआरटी मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यातील दापोडी ते निगडी दरम्यान ११ किलोमीटर मार्गावर बीआरटी रस्ता कित्येक दिवसांपासून पूर्णपणे तयार आहे. मात्र, तो वाहतुकीस खुला झालेला नाही. काहीच वापर होत नसल्याने सध्या हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी खुला करण्यात आलेला आहे. मात्र, त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे ठरावीक वाहनांकडूनच त्याचा वापर सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी दापोडी ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले व हा महामार्ग खऱ्या अर्थाने विकसित झाला. त्यानंतरच्या काळात येथे बीआरटी सुरू करण्याचा निर्णय झाला. बसथांबेही बांधण्यात आले. सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता झाली. तरीही हा मार्ग सुरू होऊ शकला नाही. त्यासाठी विविध कारणे सांगितली जातात. वास्तविक या मार्गावर बऱ्याच त्रुटी आहेत आणि वाहतुकीसाठी हा रस्ता सुरक्षित नाही, हे त्यामागचे खरे कारण असल्याचे मानले जाते. या संदर्भात काहींनी आंदोलनेही केली आहेत. यावर अपेक्षित उपाययोजना झाली नाही. परिणामी, तयार असलेला बीआरटी मार्ग पडून आहे. बीआरटी मार्ग ओलांडणे, बसची वारंवारिता, वाहतूक नियंत्रण, चौकांमधील सुरक्षितता, पादचारी, सब वे असलेली ठिकाणे अशा अनेक गोष्टी यात आहेत.
पुणे-मुंबई बीआरटी मार्ग लवकर सुरू व्हावा, या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जुलै अथवा ऑगस्टपर्यंत तो सुरू होण्याची शक्यता आहे. सांगवी-किवळे आणि वाकड-नाशिक फाटा अशा दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू आहेत. दोन्ही ठिकाणी प्रवासी संख्या चांगल्या प्रमाणात वाढली असून उत्पन्नाचे आकडेही समाधानकारक आहेत.
– विजय भोजने, उपअभियंता, पिंपरी पालिका