बांधकाम व्यावसायिक व पालिकेचे अधिकारी यांनी संगनमताने फसवले, अशी तक्रार थेरगाव येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली असून, आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. जागा विकसनासाठी घेऊन आपल्याला बेघर केल्याचे त्यांनी तक्रारअर्जात म्हटले आहे.
विठ्ठल गणपत कुंभार या ज्येष्ठ नागरिकाने आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. आपली जागा विकसनासाठी घेण्यात आली, त्या जागेत बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे व खोटय़ा कागदपत्रांच्या साहाय्याने कुलमुखत्यारपत्र तसेच विकसन करारनाम्यानुसार दिलेल्या जागेपेक्षा जास्त बांधकाम नकाशा मंजूर करून घेतला. संबंधित जागा म्हणजे रस्ता आहे, असे खोटेच दर्शवले. याविषयी पालिकेत सातत्याने तक्रार केली. मात्र, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र पोलिसांनीही दुर्लक्ष केले. कायद्याची कोणतीही भीती नसलेल्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून बांधकाम पूर्ण करून त्या व्यावसायिकाने सर्व सदनिका विकून टाकल्या. ठरल्याप्रमाणे आपल्याला घराचा ताबा दिलेला नाही, असे कुंभार यांनी म्हटले आहे. तक्रार मागे घ्या, तरच ताबा देतो, अशी धमकी बांधकाम व्यावसायिकाकडून दिली जात आहे. तक्रार केली म्हणून जाणीवर्पूवक त्रास दिला जात आहे. यासंदर्भात, आपण न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने, तुमच्या तक्रारअर्जाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे कुंभार यांना कळवले आहे.

Story img Loader