पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलखमध्ये अज्ञात व्यक्तींनी १३ गाड्यांची तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री घडली. पोलीस अशा समाजकंटकांवर लगाम कधी लावणार असा सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करत आहे.

पिंपळे निलख गावठाण येथे अज्ञात व्यक्तींनी १३ गाड्यांची तोडफोड केली. रविवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. पंचशील नगर आणि गणेश नगर या भागांमधील ८ चार चाकी गाड्या आणि ५ रिक्षांना समाजकंटकांनी लक्ष्य केले. तसेच एका दुचाकीचेही या घटनेत नुकसान झाले आहे. लाकडी दांडके, दगड आणि कोयत्याचा वापर करुन ही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमागे कोणाचा हात आहे आणि तोडफोडीचा हेतू काय ? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या महिनाभरापासून गाड्यांची तोडफोड किंवा जाळपोळीच्या घटना सुरु आहेत. सांगवी, पिंपळे गुरव,नेहरु नगर, साने चौक, निगडी या भागांमध्ये तोडफोडीच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे आता या समाजकंटकांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Story img Loader