पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत मोकाट जनावरांचा प्रश्न जटील आहे. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी सिध्द झाल्यानंतर आता हे काम खासगी संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तथापि, सर्वाधिक डोकेदुखी ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
शहरभरातील एकही रस्ता असा नसेल, जिथे मोकाट जनावरांची समस्या नाही. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. जनावरे वाहनांना अचानक आडवी येतात म्हणून अपघात होतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही. अपुरा कर्मचारी वर्ग आहे आणि या विभागातील कर्मचारी वयस्कर झाले असून त्यांना अशाप्रकारचे काम करता येणार नाही, असे रडगाणे अधिकाऱ्यांनी सातत्याने गायले. अशा कारभारामुळेच पशुवैद्यकीय विभाग हा कायम टीकेचा विषय बनला आहे. त्यातून पळवाट काढत हे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. शहरातील गाय, बैल, म्हैस, घोडा, डुकरे अशी सर्व प्रकारची बेवारस जनावरे पकडण्याचे काम त्या संस्थेला सोपवण्यात आले आहे. तथापि, भटक्या कुत्र्यांचा उल्लेख या ठरावात टाळण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांविषयी व त्यांच्यामुळे होणाऱ्या विविध त्रासांविषयी जवळपास सर्वच नगरसेवकांनी सातत्याने स्थायी सभा तसेच पालिका सभेत तक्रारी केल्या आहेत. योग्य कार्यवाही होत नसल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्यावर या विषयावरून सातत्याने टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आयुक्त राजीव जाधव हे देखील डॉ. गोरे यांच्या कार्यपध्दतीवरून तीव्र नाराज आहेत.

Story img Loader