भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहोचल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ३९ सीसीटीव्हींवर परिणाम

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्तेखोदाईचा परिणाम सीसीटीव्हींवर झाला आहे. रस्त्यांवरील खोदकामामुळे सीसीटीव्हींच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेल्या भूमिगत वायरला धक्का पोहोचल्याने हे कॅमेरे बंद पडले आहेत. दोन्ही शहरातील तब्बल ३९ सीसीटीव्ही रस्त्यांवरील खोदकामामुळे बंद पडल्याचे चित्र आहे.

महापालिका, बीएसएनएल आणि खासगी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून वारंवर पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये रस्त्यांवर खोदकाम केले जाते. राज्याचे गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी सोमवारी पुण्यात आले होते. पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला तसेच वर्षभरापूर्वी शहरात कार्यान्वित झालेल्या सीसीटीव्ही कॅमेरे योजनेचा आढावा घेतला. या बैठकीत रस्ते खोदकामामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बसविण्यात आलेले ३९ कॅमेरे बंद पडल्याची माहिती बक्षी यांना पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पुण्यातील सीसी टीव्ही कॅमेरे योजना पोलिसांसाठी उपयुक्त ठरली आहे. अनेक गुन्ह्य़ांचा छडा लावण्यास कॅमेऱ्यांची मदत झाली आहे. एक हजारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले पुणे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे आणि त्यांची देखभाल करणे हे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. पुणे शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे योजना यशस्वी झाली आहे. फक्त रस्त्यांवरील खोदकाम हाच सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा विषय ठरला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पुण्यातील सीसीटीव्ही

* शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर १२३४ कॅमेरे

*  ४४० ठिकाणी कॅमेरे

*  काही कॅमेरे ३६० अंशांत फिरणारे

*  दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर योजनेला चालना

*  पोलीस आयुक्तालयात कमांड सेंटर

*   प्रशिक्षित पोलिसांकडून संपूर्ण शहरावर नजर

गणेशोत्सवात जादा कॅमेरे

पुणे शहरात जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाले होते. दहशतवादी कारवायांना छुपी मदत करणाऱ्या एका तरुणाला जंगली महाराज रस्ता स्फोट प्रकरणात अटक झाली होती. गणेशोत्सवात विसर्जन मार्गावर अतिरिक्त सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.