देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी दिलेले बलिदान ही गौरवास्पद तितकीच स्फूर्तिदायक घटना मानली जाते. त्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे कायम स्मरण रहावे, यासाठी चिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने घेतला. त्यासाठी सहा वर्षांपूर्वी सुरू झालेली प्रक्रिया अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन व्हावे, असे नियोजन एकीकडे सुरू आहे. मात्र, रडतखडत प्रवासामुळे स्मारक काही मार्गी लागण्याची चिन्हे नाहीत. असे असताना पालिका प्रशासनाने मात्र सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त होताच सर्व काही वेगाने पूर्ण होईल, असा दावा केला आहे.
हुतात्मा दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतिवीरांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प तयार करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी झाला. चिंचवड ग्रामस्थ, चापेकर स्मारक समिती, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत करून पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. २५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाच्या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करून भूमिपूजन झाले. वेगाने काम पूर्ण करू, अशी ग्वाही पालिकेने तेव्हा दिली. प्रत्यक्षात संथपणाचा कळस झाला.
या कामाचे भूमिपूजन २०१० मध्ये झाले आणि आता चार वर्षांने चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. सुरूवातीपासून संथपणे सुरू असलेले हे काम अजूनही रखडलेल्याच अवस्थेत आहे. मध्यंतरी पुतळ्यांची उंची खूपच कमी असल्याचे लक्षात आले. ते दूरवरून दिसणारच नाहीत, अशी खात्री झाल्यानंतर, त्यात बदल करण्यात आले. आता सात ते १२ फुटापर्यंतची उंची असलेले सुधारित पुतळे नाशिक येथे तयार स्थितीत आहेत. मात्र, स्मारकाच्या ठिकाणी आवश्यक कामे पूर्ण झालेली नाहीत. स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावे, यादृष्टीने राजकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. नियोजित जागेवर वेगळीच परिस्थिती आहे. कामाच्या दिरंगाईवरून चिंचवडकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नुकतेच गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत गावातील एका मंडळाने हा विषय प्रभावीपणे मांडला. ‘माझे स्मारक पूर्ण होणार तरी कधी’ असा प्रश्न खुद्द चापेकरच विचारत होते, असा आशय होता. विशेष म्हणजे आयुक्त राजीव जाधव तेव्हा स्वागत कक्षातच उपस्थित होते.

पुतळे तयार आहेत, सर्व काही मार्गी लागलेले आहे. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ यायचं आहे. ते मिळाले की १५ दिवसांत काम पूर्ण होईल. पुतळ्यांची उंची आधी कमी होती. ती वाढवून घेण्यात आली आहे. अन्य अनेक कारणांमुळे विलंब झाला आहे. मात्र, आपण नुकतेच या कामावर रूजू झालो आहोत. त्यामुळे विलंबाची कारणे सांगता येणार नाहीत.
डी. एन. गट्टूवार, कार्यकारी अभियंता
— — —
कोटय़वधी रूपये खर्च करून उपयोग शून्य
चिंचवडगावात येणारे विविध रस्ते चापेकर चौकात एकत्र येतात. येथे वाहनांची मोठी गर्दी होते, त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती. त्यावर पर्याय म्हणून येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला. त्यास मंजुरी मिळाली. त्यासाठी चापेकरांचा पिस्तूलधारी पुतळा असलेले ६५ फूट उंचीचे टॉवर हटवण्यात आले. मात्र, या कामालाही विलंब झाला, त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला, त्यात अनेकांनी ‘हात धुवून’ घेतले. ज्या कारणासाठी पूल बांधला, तो सार्थकी लागलाच नाही. आजही चापेकर चौकातील कोंडी कायम आहे. कोटय़वधी रूपये खर्चूनही पुलाचा उपयोग नाही, असेच दिसते. पुलाखाली बाजार भरलेला असतो. जिथे-तिथे अतिक्रमणे आहेत. पालिका व वाहतूक पोलिसांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात येते.

Story img Loader