ऐरवी पिंपरी-चिंचवडमध्ये छटपूजा उत्सव साजरा व्हायचा. मात्र त्याचा फारसा गाजावाजा होत नव्हता. यंदा मात्र चित्र वेगळेच दिसून आले. शहरात सव्वालाख उत्तर भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मतांचे गणित लक्षात घेत या उत्सवाला राजकीय स्वरूप देण्यात आले. राजकीय मंडळींचा मोठा सहभाग उत्सवात दिसून आला. त्याच पद्धतीने, उत्सवाचा थाटही यंदा वेगळाच होता.

देशाच्या कानाकोपऱ्यातून चरितार्थासाठी उत्तर भारतीय नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले आहेत. जवळपास सव्वालाख उत्तर भारतीय नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. महापालिका निवडणुकांमुळे उत्तर भारतीयांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून राजकीय नेते सक्रिय झाल्यामुळे छटपूजेला यंदा बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातच रविवारी सुट्टीच्या दिवशी छटपूजेचा दिवस आल्याने महोत्सवाला नेहमीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.

पिंपरीतील झुलेलाल घाट, चिंचवडगावातील मोरया घाट, निगडी-प्राधिकरणातील गणेश तलाव, भोसरीतील उद्यान, मोशीत इंद्रायणीचा घाट आदी ठिकाणी छटपूजेचे कार्यक्रम झाले. सर्वच ठिकाणी मोठय़ा संख्येने भाविक विशेषत: महिला सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. पिंपरीतील कार्यक्रमात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, उत्तर प्रदेशचे पंचायत राज्यमंत्री ब्रीजलाल सोनकर, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, नगरसेवक कैलास कदम, अरुण टाक, प्रमोद ताम्हणकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सुखलाल भारती, सुनीता यादव, राजू विश्वकर्मा आदींनी केले. मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छट पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार महेश लांडगे, नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, संस्थेचे अध्यक्ष लालाबाबू गुप्ता, दिलीप गोसावी आदी उपस्थित होते. या महोत्सवासाठी भोसरी, चिंचवड, चिंबळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, नेहरूनगर, आकुर्डी, तळवडे, मोशी, आळंदी आदी भागातून भाविक आले होते. निगडी प्राधिकरणातील गणेश तलावातही छट पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे बाळा िशदे तसेच मंजू पांडे आदींनी आयोजन केले होते.

Story img Loader