मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘चित्रपदार्पण’ पुरस्काराच्या स्पर्धेत ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा आणि दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या कलावंत, निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘चित्रपदार्पण’ पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी शंतनू रोडे यांना ‘जय जयकार’ चित्रपटासाठी दिग्दर्शन आणि पटकथा लेखनचा पुरस्कार मिळाला. आरोह वेलणकर याला ‘रेगे’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पर्ण पेठे हिला ‘रमा-माधव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि संस्कृती बालगुडे हिला ‘सांगते ऐका’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. शिल्पा गांधी यांना ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्रीचा तर रमेश परदेशी यांना ‘रेगे’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मनवा नाईक यांना ‘पोरबाजार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथानकाचा पुरस्कार मिळाला. गंधार संगोराम यांना संगीतासाठी पुरस्कार मिळाला आहे. समीर दीक्षित यांच्या पिकल एन्टरटेन्मेंटला वितरणासाठी पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सलचा ‘स्वतंत्रते भगवती’ हा अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून प्रचला अमोणकर (अल्बम- मन एक पाखरू), सर्वोत्कृष्ट गायक म्हणून मंगेश बोरगावकर (पाऊस उन्हाचा वैरी) यांना पुरस्कार मिळाले.