पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीबाबत पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिडचिड सोमवारी स्पष्टपणे जाणवली. ‘‘परदेशी राहणार की नाही, याची हमी द्यायला मी बसलो नाही. चांगल्या अधिकाऱ्यांची गरज इतर ठिकाणीही असते. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे आम्ही प्रशासकीय निर्णय घेऊ’’, असे सांगत त्यांनी परदेशींच्या बदलीचे संकेत दिले. मात्र, आता पिंपरी- चिंचवडमध्ये परदेशींची गरज संपली का, या प्रश्नावर ‘‘प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही’’, असे सांगत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेणाऱ्या व पालिकेमध्ये विविध पारदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या परदेशी यांच्या बदलीबाबत गेल्या आठवडय़ापासून चर्चा आहे. त्यांची बदली होऊ नये, यासाठी विविध संस्था व संघटनांच्या वतचीने आंदोलनही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राजकीय दबावातून परदेशी यांची बदली करू, नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये परदेशी यांच्या बदलीबाबत प्रश्न विचारण्यात आले.
पवार म्हणाले की, एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याची गरज चांगले काम होण्यासाठी इतर ठिकाणीही असते. विक्रीकर, आरटीओ, अबकारी कर आदी विभागात उत्पन्न वाढविण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असते. पुणे जिल्ह्य़ाचा पालकमंत्री म्हणून गेल्या नऊ वर्षांत या भागात मीच प्रमुख अधिकारी आणतो. परदेशी यांचे नांदेड येथील काम पाहून मीच त्यांना पिंपरी- चिंचवडमध्ये आणले. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. त्यानुसार प्रशासकीय निर्णय घेतले जातील.
अनधिकृत बांधकामांबाबत ते म्हणाले की, रस्त्यावर त्याचप्रमाणे आरक्षणे असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामे काढली पाहिजेत. उच्च न्यायालयाचा आदेश बंधनकारक आहे. पण, काही बाबी नियमात बसविण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. नगरसेवकांनी काही सूचना केल्या. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. बेकायदा बांधकामांचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र, काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून करण्याचा प्रयत्न होतो आहे.

प्रभाकर देशमुखांना मात्र ‘क्लीन चिट’

विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर बेकायदा जमीन खरेदीबाबत झालेल्या आरोपांबाबत अजित पवार यांना विचारले असता, ‘‘संबंधित आरोपांबाबत कोणतेही पुरावे नाहीत. देशमुख यांनी त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांसह माझ्याकडे व मुख्य सचिवांपुढे मांडली आहे. त्यांच्यावरील आरोपात कोणतेही तथ्य नाही’’, असे सांगत देशमुख यांना त्यांनी ‘क्लीन चिट’ दिली. काही अधिकारीच संबंधितांची जागा पटकाविण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पसरवित असतात. विशेषत: पोलीस दलामध्ये हे प्रकार जास्त होतात, असेही पवार म्हणाले.

Story img Loader