पालिकेकडून स्वच्छतेसाठी प्रतिसादच मिळत नसल्याचे सांगत नाटय़गृह व्यवस्थापनाचे हात वर
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून गेल्या तीन महिन्यांपासून नाटय़गृहात येणाऱ्या प्रेक्षकांना शौचालयांतून येणाऱ्या तीव्र दरुगधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाटय़गृहातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतरही नव्याने निविदाच काढण्यात आली नसल्याने ही वेळ आली आहे. पालिका मुख्यालयातून आमच्या कोणत्याही कामासाठी प्रतिसादच मिळत नसल्याचे सांगत नाटय़गृह व्यवस्थापनाने हात वर केले आहेत.
पुण्यातील नाटय़गृहांमधील अस्वच्छतेचा मुद्दा चर्चेत असतानाच, भोसरीतील नाटय़गृहाच्या दरुगधीच्या समस्येने उग्र रूप सर्वासमोर आले आहे. नाटय़गृहात पाऊल ठेवताच या दरुगधीचा प्रत्यय येतो. नाटय़गृहात जाऊन बसल्यानंतरही ही दरुगधी पिच्छा सोडत नसल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दोन्हीही बाजूला असलेल्या शौचालयांची तीव्र दरुगधी दूपर्यंत येते. याशिवाय, जागोजागी गुटखा आणि पान खाऊन थुंकल्याने भिंती रंगल्या आहेत. व्यासपीठाभोवती अस्वच्छता आहे. अन्यही बऱ्याच समस्या आहेत. शनिवारी (१२ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाटय़गृहात येणार होते, तेव्हा पालिकेचे कर्मचारी लावून तात्पुरती व्यवस्था व रंगरंगोटी करण्यात आली होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वैयक्तिकरीत्या येऊन सर्व गोष्टींची पाहणी केली होती. मात्र, त्या आधी आणि नंतरही ‘जैसे थे’ परिस्थिती आहे.
तीन महिन्यांपूर्वी नाटय़गृहातील स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपली. याबाबतची पूर्वकल्पना नाटय़गृह व्यवस्थापनाने वरिष्ठांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुढील अपेक्षित कार्यवाही झाली नाही. नव्याने निविदा काढण्यात आली नाही. परिणामी, शौचालय आणि एकूणच नाटय़गृहातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून वेळ निभावून नेण्यात येते. पालिका कर्मचारी येतात आणि काम केल्यासारखे दाखवून निघून जातात. इतर वेळी तसे होत नाही. अस्वच्छतेविषयी नागरिक, नाटक कंपन्या, विविध संस्थांचे प्रतिनिधी तक्रारी करतात. त्याकडे लक्ष दिले जात नाही. वेळप्रसंगी इतर कामांसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची कामे करणे भाग पडते.
एकीकडे, महापालिकेकडून स्वच्छतेविषयी जनजागृतीचे ढोल बडवण्यात येत असताना, पालिकेच्याच वास्तूत नियोजनशून्य कारभारामुळे दरुगधीचे साम्राज्य आहे आणि त्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष असल्याची विसंगती दिसून येते.