काँग्रेस, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहर तसा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हळूहळू करत राष्ट्रवादीने तो हिरावून घेतला. सध्या काँग्रेसमध्ये गळतीचा हंगाम सुरू असल्याने पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी असलेले गतवैभव काँग्रेसला परत मिळवायचे आहे. प्रत्यक्षात, तशी परिस्थिती नाही. कारण, सततची गळती थांबण्याची काही चिन्हे नाहीत आणि नव्याने सत्ता खेचून आणण्यासारखे उमेदवार अथवा सक्षम चेहरा पक्षाकडे नाही.
महापालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. एकत्रित काँग्रेस असेपर्यंत शरद पवार व अजित पवार यांच्याशी कधी जुळवून घेत तर कधी संघर्ष करत मोरे यांनी कारभार केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार त्या पक्षाचे नेते झाले, तर काँग्रेसचे नेतृत्व मोरे यांच्याकडे राहिले. सन २००२ च्या पालिका निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राज्यातील आघाडीचा ‘फॉम्र्युला’ वापरत दोन्ही काँग्रेसने एकत्र येत पालिका ताब्यात घेतली. पाच वर्षांत बऱ्याच कुरबुरी व शहकाटशहाचे राजकारण झाले. दरम्यानच्या काळात मोरे यांचे निधन झाले. अजित पवार यांच्याशी दोन हात करू शकेल, असे कणखर नेतृत्व न मिळाल्याने आणि एकूणच वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष झाल्याने शहर काँग्रेस पोरकी झाली.
पुढे, २००७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला शहरातील काँग्रेसचा हक्काचा मतदार स्वत:कडे वळवण्यात यश आले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात कुठेही नाही, असा निकाल पिंपरीत लागला. राष्ट्रवादीने एकटय़ाच्या जीवावर पालिकाजिंकली. काँग्रेसला जेमतेम २० जागा मिळाल्या. २८ ठिकाणी काँग्रेसला उमेदवारही उभे करता आले नाहीत. सन २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची आणखी घसरण झाली, २० नगरसेवकांचे संख्याबळ १४ पर्यंत खाली आले. गौतम चाबुकस्वार, भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, जालिंदर िशदे, गणेश लोंढे, कैलास कदम, सद्गुरू कदम, गीता मंचरकर, आरती चोंधे, सविता आसवानी, विमल काळे, शकुंतला बनसोडे, जयश्री गावडे हे १४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, एकेक करत काँग्रेसला त्यांनी रामराम ठोकला. चाबुकस्वार यांनी सर्वप्रथम काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात पिंपरीची जागा काँग्रेसला सुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी मिळाली व ते निवडूनही आले. पिंपळे-निलखच्या नगरसेविका आरती चोंधे, पिंपरीतील नगरसेविका सविता आसवानी, चिंचवडच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी भाजपची वाट धरली. माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली राहुल भोसले, विनोद नढे, गणेश लोंढे आदी सात नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले. खराळवाडीतील नगरसेवक कदम बंधूंनी बरीच चाचपणी केली. मात्र, ते काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले. भोसरीतील काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर िशदे काँग्रेस सोडणार, हे निश्चित आहे. तथापि, भाजप की राष्ट्रवादीत प्रवेश, यावर त्यांचा खल सुरू आहे.
महिला अध्यक्षा ज्योती भारती यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी ‘जाता-जाता’ केला. प्रत्यक्षात, काँग्रेसकडून निवडून येणे शक्य नसल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिवसेनेतही चाचपणी करून सर्वार्थाने सोयीचा पक्ष म्हणून त्यांनी भाजपची निवड केल्याचे सांगण्यात येते.
आता सचिन साठे हे सर्वपरिचित म्हणता येईल, असे एकच नाव काँग्रेसमध्ये राहिले असून त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या तसेच उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष जिवंत ठेवला आहे. ते यंदा पिंपळे निलखमधून पुन्हा राजकीय भवितव्य आजमावून पाहात आहेत. शहराध्यक्षपद आणि प्रभागातील पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी यात त्यांची धावपळ होणार असून त्याचे परिणाम पक्षाच्या कामावर होणार आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासारखी तूर्त तरी काँग्रेसची परिस्थिती नाही. राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास काहीतरी पदरात पडू शकते. मात्र, युतीत काय होणार, त्यावर दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.
महापालिकेत काँग्रेस
- २००७- २० नगरसेवक
- २०१२- १४ नगरसेवक