पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या व रस्त्याच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने रावेत येथे थेट पवना नदीपात्रातच आडवा रस्ता बांधला, त्यासाठी त्याने कोणाचीही परवानगी घेतली नाही. कंत्राटदाराच्या या प्रतापामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नदीपात्रातून विरुद्ध दिशेला पाणी परत फिरू लागल्याची माहिती येथील नागरिकांनी महापालिकेला कळवली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महापालिकेने तो रस्ता हटवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने

रावेत येथील नदीपात्र अडवून तेथे रस्ता तयार करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबला होता.
रावेत येथील नदीपात्र अडवून तेथे रस्ता तयार करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबला होता.

तेथून पोबारा केला.
पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाणी आणले जाते. निगडी येथे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे, येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. निगडीच्या वरच्या भागात रावेत येथे राष्ट्रीय महामार्ग महामंडळाच्या वतीने रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ट्रक, डंपर व अन्य साहित्याची ने-आण करण्यासाठी रस्ता हवा होता. त्याने पाटबंधारे विभाग, महापालिका अशी कोणाचीही परवानगी न घेता नदीपात्रातच रस्ता तयार केला, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. परिणामी, जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचण्यात अडथळे येऊ लागले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रविवारी काही भागात पाणी पोहोचले नव्हते. सोमवारी तर शहराचा अर्धा भाग पाण्यापासून वंचित राहिला. नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढू लागल्या, त्यामुळे अधिकारी वैतागले. धरणातून पाणी सोडले जात असताना ते जलशुद्धीकरण केंद्रात का पोहोचत नाही, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांनाही पडला होता. रावेत भागातील काही रहिवाशांनी नदीपात्रात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याची माहिती पालिकेला कळवली. अधिकारी चक्रावले, त्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा सर्व प्रकार उघड झाला. नदीपात्रातच रस्ता बांधल्याची माहिती त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार, दोन पोकलेन, जेसीबी अशा यंत्रणेद्वारे तो रस्ता हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यानंतर पाण्याचा प्रवाह पूर्ववत होऊ लागला. दरम्यानच्या कालावधीत कंत्राटदाराने काढता पाय घेतला. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Story img Loader