सलग सुट्टय़ांमुळे परगावी गेल्याचा फायदा घेऊन पिंपरीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील आठ सदनिका फोडण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणात नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची चौकशी सुरू असून या प्रकरणी पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-मासुळकर कॉलनीतील ‘डब्लय़ू सेक्टर’ या इमारतीत पोलीस कर्मचारी, शिक्षण विभागातील लिपिक, न्यायालयीन कर्मचारी राहतात. सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी राहणारे अनेक कर्मचारी गावाला गेले आहेत, त्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी रविवारी पहाटे येथील आठ बंद सदनिका फोडल्या. त्यात सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. सदनिका फोडण्यापूर्वी चोरटय़ांनी शेजारच्या सदनिकांना बाहेरून कडय़ा लावल्या होत्या. फोडण्यात आलेल्या सदनिकांचा कडी कोयंडा उचकटून त्यांनी आत प्रवेश केला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन निकम यांनी सांगितले, की आतापर्यंत एका सदनिकेतील रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. इतरांकडे दूरध्वनीवरून चौकशी करण्यात आली आहे. या इमारतीत कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत आठ सदनिका फोडल्या
सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी राहणारे अनेक कर्मचारी गावाला गेले आहेत, त्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी रविवारी पहाटे येथील आठ बंद सदनिका फोडल्या.
First published on: 18-08-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime robbery pimpri masulkar colony