अफवाखोरांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

नोटाबंदीमुळे समाजमाध्यमांवर सध्या अफवांचा बाजार भरला आहे. तसेच तोंडी अफवाही शहरात जोरात आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात व्यापाऱ्यांची मोठी रोकड सापडली आहे, चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटा वटवून मिळत आहेत, तीस टक्के कमिशनवर नोटा बदलून मिळत आहेत या आणि अशा अनेक अफवा मोठय़ा प्रमाणावर पसरवल्या जात असून या अफवांच्या बाजारामुळे नागरिकांमध्ये भलत्याच विषयांची जोरात चर्चा आहे. दरम्यान, अफवा पसरवण्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी मंगळवारी दिला.

चलन तुटवडय़ामुळे सामान्यांची होरपळ सुरू आहे. गेल्या मंगळवारी (८ नोव्हेंबर) सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. या आदेशामुळे सामान्य तसेच अनेक बडे व्यापारी धास्तावले आहेत. बँकेत जुन्या नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या आहेत. बँकाबाहेरील गर्दी तसेच तेथे होणाऱ्या भुरटय़ा चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत असताना भरीस भर म्हणून समाजमाध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या संदेशांनी अनेकांना भयभीत करण्याचे काम सुरू केले. अर्थतज्ज्ञांची नावे वापरून लेख प्रसारित करण्यात येत आहेत. भरीस भर म्हणून जुन्या नोटा वटवून मिळतील, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. काळ्या बाजारातील जुन्या नोटा बदलून मिळतील. एक लाख रुपये दिल्यास सत्तर हजार रुपये परत करण्यात येईल, अशा अफवा पसरवण्यात येत आहेत.

व्यापाऱ्यांची मोठी रोकड पकडल्याच्या अफवा सोमवारी सायंकाळी पसरवण्यात आल्या. या पाश्र्वभूमीवर परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली म्हणाले, की समाजमाध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या संदेशांवर पोलिसांचे लक्ष आहे. सोमवारी पोलिसांनी व्यापाऱ्यांची रोकड पकडल्याचे संदेश प्रसारित करण्यात आले होते. अशा प्रकारांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.

एटीएम केंद्रांची माहिती संकलित करणार

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विविध बँकांची मिळून साडेतीन हजार एटीएम केंद्रे आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या बँका आणि एटीएम केंद्राची संख्या तसेच माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकाबाहेर लागलेल्या रांगा पाहता तेथे वादावादीचे प्रसंग होऊ नयेत, तसेच भुरटय़ा चोऱ्या होऊ नयेत यासाठी पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बँकांना भेट देऊन तेथील आढावा घेण्यात यावा, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

गुन्हे कमी, पोलिसांवरील ताण कायम

गेल्या आठवडाभरात शहरात घरफोडी, लूटमार तसेच चोऱ्यांचे गुन्हे कमी झाले आहेत. जुन्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे कमी झाले आहेत, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. चलनतुटवडय़ामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Story img Loader