गर्दी वाढली, खर्चातही भरमसाट वाढ; इच्छुक उमेदवारांचा दहीहंडीच्या लोकप्रियतेवर डोळा
मुंबई, ठाण्यातील ‘कॉर्पोरेट’ दहीहंडय़ांचा ‘आदर्श’ डोळय़ांसमोर ठेवून िपपरी-चिंचवड उद्योगनगरीत गेल्या काही वर्षांत दहीहंडय़ांचे पेव फुटले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पाश्र्वभूमी असलेले ‘आयोजक’ वाढले आहेत. नागरिकही पारंपरिक दहीहंडय़ांकडे पाठ फिरवत असून, मनोरंजनाचे कार्यक्रम व सेलिब्रेटींची उपस्थिती असणाऱ्या दहीहंडय़ांकडेच झुंबड उडते आहे. पूर्वीच्या तुलनेत कार्यक्रमाच्या खर्चामध्ये तब्बल आठ ते दहापट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील दहीहंडी कार्यक्रमांची संख्या यापूर्वी मर्यादित होती. चाळीत, सोसायटय़ांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून फक्त दहीहंडी फोडली जात होती, इतर कार्यक्रमांचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे खर्चही आटोक्यात राहत होता. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले. मुंबई, ठाण्यात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांचा थाट पाहून व त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारावून शहरातील हौसे, नवसे, गवशांनी दहीहंडीचे कार्यक्रम सुरू केले आणि उत्सवाच्या नावाखाली ‘पैशाचा धूर’ही सुरू केला. वाकड, िपपळे गुरव, प्राधिकरण, चिंचवड, िपपळे निलख, भोसरी आदी भागांत खर्चिक व गर्दीचा कहर करणाऱ्या दहीहंडय़ा होऊ लागल्या. दहा वर्षांपूर्वी होणारा खर्च आणि सध्याच्या काळात होणारा खर्च, यामध्ये आठ ते दहापट फरक पडल्याचे आयोजक सांगतात. आता केवळ दहीहंडी लावून चालत नाही, मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यावे लागतात. त्यासाठी आकर्षक ध्वनिक्षेपक यंत्रणा (डीजे) लागतो, त्यासाठी मोठा खर्च होतो. नेहमीच्या तुलनेत ‘डीजे’चे दर या काळात दुपटी-तिपटीने वाढलेले असतात. गर्दी जमवण्यासाठी हिंदूी-मराठी चित्रपटांतील कलावंतांची हजेरी लावली जाते आणि कलावंत आले म्हणून उपस्थितांच्या संख्येतही कमालीची वाढ होते, असे गर्दीचे समीकरण आहे. वाढत्या गर्दीचा आवाका लक्षात घेता मोठय़ा मैदानात कार्यक्रमाची व्यवस्था करावी लागते. त्यादृष्टीने आवश्यक व्यासपीठाची उभारणी करावी लागते. खर्चासाठी काहींना प्रायोजकांची ‘कृपादृष्टी’ लाभते, तर काही देणग्यांचा आधार घेताना दिसतात. आता महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने इच्छुक उमेदवारांनी दहीहंडीच्या लोकप्रियतेचा आधार घेतला आहे. त्यामुळे यंदा आयोजकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पारंपरिक पद्धतीच्या दहीहंडीच्या तुलनेत नागरिकांची मनोरंजनात्मक कार्यक्रम व कलावंतांची हजेरी असणाऱ्या दहीहंडय़ांना जाण्याची अधिक पसंती आहे. लाखोंचा चुराडा करणाऱ्या या दहीहंडय़ांसाठी १० ते ५० हजारांपर्यंत नागरिकांची गर्दी होते, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण येतो, तो वेगळाच!
अध्र्या तासाच्या हजेरीसाठी लाखोंची बोली
शहरातील दहहंडीसाठी हिंदूी-मराठी चित्रपटांतील तारका व कलावंतांची हजेरी हा आकर्षणाचा केंद्रिबदू झाला आहे. केवळ अध्र्या तासाच्या थांब्यासाठी अवाच्या सवा मानधन कलाकार घेतात. तीन ते २५ लाखांपर्यंतचे मानधन दिल्याचे दाखले आयोजक देतात. यंदा निवडणुकांच्या तोंडावर कलाकारांनी मानधनात तिप्पट-चौपट वाढ केली आहे. राजकीय आयोजकांनी तीही देण्याची तयारी ठेवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तारका, नृत्यांगनांना आतापर्यंत चांगला भाव होता. आता ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘सैराट’च्या कलावंतांना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले.
((( उद्योगनगरीतील दहीहंडी कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीचे प्रातिनिधिक चित्र. ))