दहीहंडीबाबतच्या आदेशांचे उल्लंघन करण्याची तयारी; निवडणूक इच्छुक उमेदवारांकडून दौलतजादा

दहीहंडी उत्सवासाठी िपपरी-चिंचवड उद्योगनगरी सज्ज झाली असून न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवण्याची संपूर्ण तयारी आयोजक मंडळींनी केली आहे. गेल्या काही वर्षांत दहीहंडीची वाढलेली लोकप्रियता ‘कॅश’ करण्यासाठी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांकडून लाखो रुपयांचा चुराडा होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. पुणे तसेच पिंपरी -चिंचवड या शहरांमध्ये गुरुवारी दहीहंडीच्या दिवशी मंडळांकडून नियमभंग होण्याच्या शक्यतेने पोलीसही कारवाईसाठी सज्ज झाले आहेत.

दहीहंडी २० फुटांपेक्षा उंच उभारता येणार नाही, तसेच १८ वर्षांपेक्षा लहान मुलाला दहीहंडीत सहभागी होता येणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे, ध्वनिप्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याची तंबीही न्यायालयाने दिली आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्याची मानसिकता आयोजकांमध्ये दिसून येत नाही. दहीहंडीची उंची व त्यामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांची तयारी पाहता गुरुवारी दहीहंडीच्या दिवशी न्यायालयाचे आदेश थेटपणे धाब्यावर बसवण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

शहरात भोसरी, िपपरीगाव, िपपळे गुरव, वाकड, चिंचवड, कासारवाडी, दापोडी आदी भागात मोठय़ा दहीहंडय़ा उभारण्यात आल्या आहेत. विद्यमान नगरसेवक तसेच आगामी महापालिका निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले राजकीय कार्यकर्तेच आयोजक आहेत. पारंपरिक उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली तसेच नागरिकांचे मनोरंजन करण्यात येत असलेल्या सबबीखाली मोठय़ा प्रमाणात पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. लाखो रुपयांचे मानधन देऊन कलाकारमंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, खर्चिक ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच व्यासपीठाची आकर्षक रचना आदींसाठी लाखो रुपये खर्ची करण्यात येत आहेत. न्यायालयाच्या आदेशाची फारशी गंभीरपणे कोणी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे गुरुवारी उत्सवाच्या दिवशी काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांची तयारी

  •  मध्य भागातील शिवाजी रस्ता, शनिपार, मंडईतील वाहतूक सायंकाळनंतर बंद.
  • मध्य भागात राज्य राखीव पोलीस दल व शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात.
  • १९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ७५ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक  तसेच ५०० पोलीस खास बंदोबस्तासाठी.

Story img Loader