पिंपरी-चिंचवड हद्दीत नदीकाठी असणारी बेकायदेशीर, भराव टाकून केलेली, नाल्याजवळची व कमी कालावधीत उभारलेली जवळपास ७६ बांधकामे प्राधान्याने पाडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पालिकेने अशा इमारतींचे सव्र्हेक्षण केले असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लवकरच त्या इमारती पाडण्यात येतील. वाकड येथे एका सोसायटीची भिंत पडायला आली असून ती पाडून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. काळेवाडी येथील चर्चची इमारत धोकादायक झाली असून त्याचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. रहाटणी येथील वादग्रस्त इमारतीवर कारवाई झाल्यानंतर नोटिसा बजावण्यात आलेल्या अभियंत्यांना ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे.
थेरगाव येथे वेंगसरकर अॅकॅडमी शेजारी २०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असून चिंचवडच्या तालेरा रुग्णालयात शिल्लक असलेले लिफ्टचे काम लवकरच पूर्ण होईल. जिजामाता रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मिळकतकर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असून रविवार असला तरी पालिकेची कार्यालये खुले राहणार आहेत. एलबीटी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगत मेल व पत्राद्वारे १५ हजारजणांना आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या जुन्या सभागृहाजवळ ‘हेल्पलाईन’ कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.