हद्दीलगतची ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. तथापि, चहुबाजूने तीव्र विरोध असल्याने पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मात्र ‘अधांतरी’च आहे. विकास हवा असल्यास पिंपरीत समाविष्ट व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने केले असतानाही राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
देहू, आळंदी, चाकण, हिंजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे पिंपरी पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. हद्दीलगतची गावे समाविष्ट करता येतील का, अशी विचारणा राज्य शासनाने पिंपरी पालिकेला केल्याने हा विषय चर्चेत आला. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला असता बरेच दिवस तो रखडवण्यात आला होता. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर पालिका सभेतही त्याची पुनरावृत्ती झाली. कोणतीही चर्चा न होता हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला आहे. नऊ जूनला होणाऱ्या सभेत या विषयावर चर्चा होऊ शकणार आहे. गावांचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अथवा तो फेटाळण्याचा अधिकार सभेला असल्याने सभेतील निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तथापि, पदवीधर निवडणुकांच्या आचारसंहितेचे सावट त्यावर आहे.
पिंपरी पालिकेत येण्यास संबंधित गावक ऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यापूर्वी पिंपरीत समाविष्ट झालेल्या गावांची अवस्था पाहता आम्हाला तिथे काहीही भवितव्य नाही, असा सूर या गावांमधून व्यक्त होतो आहे. त्यामुळे विरोधाचे ठराव करून ग्रामपंचायतींनी राज्य शासनाकडे पाठवले आहेत. तालुका पंचायत समित्या व पुणे जिल्हा परिषदेनेही तीच भूमिका घेतली आहे. हिंजवडीची स्वतंत्र नगरपालिका करून त्यात माण, मारूंजी, नेरे, कासारसाई, जांबे व हिंजवडीचा समावेश करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. अजितदादा गावे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहेत. विकास हवा असेल तर पालिकेत या, असे आवाहन त्यांनी केले आहे. तथापि, विरोधकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही तीव्र विरोध दर्शवल्याने त्यांची अडचण झाली आहे. परिणामी, राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतल्याने नव्या गावांचा विषय अधांतरीच आहे.

Story img Loader