दुसरा सर्जिकल स्ट्राइक महाराष्ट्रात करु, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पिंपरी चिंचवडमधील प्रचारसभेत म्हटले आहे. ‘उद्धव ठाकरे यांना मुंबईतील तर अजित पवारांना पिंपरी चिंचवडमधील सत्ता जाण्याची भीती वाटते आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांकडून भाजवर टीका केली जाते आहे,’ असे म्हणत पर्रिकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
‘उद्धव ठाकरे भाजपविरोधात गरळ ओकत आहेत. अजित पवारसुद्धा भाजपवर टीका करत आहेत. मुंबई आणि पिंपरी चिंचवड या श्रीमंत महापालिका आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना या महापालिका हातून जातील, अशी भीती वाटते. त्यामुळेच हे नेते सध्या भाजपच्या नावाने खडे फोडत आहेत,’ अशी टीका पर्रिकर यांनी केली. ‘पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची वाटचाल शून्यातून सत्तेच्या दिशेने सुरू आहे. भाजपची सत्ता आल्यास आपल्याला हलाखीचे दिवस येतील, याच विचारातून अजित पवार आणि उद्धव ठाकरेंकडून भाजपवर टीका केली जाते आहे,’ असे म्हणत मनोहर पर्रिकर यांनी विरोधकांवर तोफ डागली. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे आणि उमेदवार उपस्थित होते.