पिंपरी महापालिकेने कोटय़वधी रूपये खर्चून उभारलेले निगडीतील कलादालन बंद करून तेथे व्यापारी केंद्र सुरू केले, त्यानंतर कलादालन या विषयाचा पालिकेने अक्षरश: ‘फुटबॉल’ केला. त्याचे पडसाद शुक्रवारी चिंचवड येथील एका कार्यक्रमात उमटले. तेव्हा आयुक्त राजीव जाधव यांनी, पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलणाऱ्या नियोजित पर्यटन विकास आराखडय़ात अद्ययावत स्वरूपातील कलादालनाचा समावेश करू, अशी ग्वाही दिली.
छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या लडाख येथील प्रकाशचित्रांचे प्रदर्शन चिंचवडच्या मोरया यात्री सभागृहात सुरू झाले, त्याचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, क्रीडा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर, चिंचवड देवस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र देवमहाराज, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक राजू साळुंके, गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन १६ जूनपर्यंत सर्वासाठी विनामूल्य आहे.
शहरात कलादालन असावे, अशी सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनी सातत्याने मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. निगडीतील कलादालन बंद केल्यानंतर भोसरीच्या नाटय़गृहात पालिकेने कलादालन उभारले. मात्र, ते सुरूच झाले नाही. या पाश्र्वभूमीवर, या कार्यक्रमात कृष्णकुमार गोयल यांनी कलादालनाचा मुद्दा मांडला. तर, तेंडूलकरांनी निगडीतील कलादालनाच्या जागेवर व्यापारी केंद्र सुरू केल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. या वेळी आयुक्त म्हणाले,की विकसकांनी त्यांच्याकडील सेवासुविधांच्या जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे कलादालनासारख्या गोष्टींची पूर्तता करता येईल. त्याचप्रमाणे, नियोजित पर्यटन विकास आराखडय़ात सर्व सोयीसुविधायुक्त कलादालनाचा समावेश करू. पालिकेने कलाधोरण राबवण्यास सुरूवात केली असून शहरातील कलाकारांच्या पाठीशी महापालिका ठामपणे राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. प्रास्ताविक कशाळीकर यांनी केले. अण्णा बोदडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले.