संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्याचे बुधवारी जाहीर केले. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
राजगुरूनगरमधील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिरूरमधून उभे राहिल्यास अजित पवार यांचे डिपॉझिट जप्त करू, असे सरळ आव्हान दिले होते. त्याच मतदारसंघातून राष्ट्रवादीने निकम यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे अजित पवार यांनी बुधवारी जुन्नरमधील पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग दोनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकी शिरूर आणि त्याआधी खेड लोकसभा मतदारसंघाचे आढळराव-पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देते याकडे पुणे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष होते. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी देवदत्त निकम यांच्या नावाची घोषणा केली. निकम हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
शिवसेनेची अवस्था बिकट असून, त्यांचे खासदार पक्ष सोडून बाहेर पडताहेत. त्यांचे आणखी काही खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा हल्ला अजित पवार यांनी या मेळाव्यात केला.

Story img Loader