सत्ताधाऱ्यांची ‘खाऊगल्ली’; विरोधकांचे ‘तोडपाणी’
पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुका ‘विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ याच मुद्दय़ावर लढल्या जाणार आहेत, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. गेल्या १० वर्षांतील शहरविकासाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणार आहे. तर, विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट आणि कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा मुद्दा राहणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून जनतेच्या पैशाची लूटमार होत असताना विरोधकांनी स्वत:ची तुंबडी भरून घेतल्याची उदाहरणे आहेत. स्थायी समिती, पालिका सभा किंवा विषय समित्यांमध्ये निर्णय होत असताना विरोधी नगरसेवक काय करतात. सत्ताधारी कुरणात चरत असताना सत्ताधाऱ्यांनी फेकलेल्या तुकडय़ांवर विरोधकही समाधान मानत राहिले.
पिंपरी पालिकेच्या निवडणुकांचे चित्र आता पुरते स्पष्ट झाले आहे. बहुचर्चित प्रभागरचना जाहीर झाल्या, आरक्षणांची सोडत झाली, कोण-कोणाच्या ‘आमने-सामने’ येऊ शकतो, याचे प्राथमिक चित्रही दिसू लागले. युती आणि आघाडय़ांचे निर्णय होण्यास अवधी असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या व्यूहरचना सुरू झाल्या. गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी पालिकेच्या सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्ता ताब्यात घ्यायची आहे, तर अन्य पक्षांना ‘राष्ट्रवादीमुक्त’ पालिका हवी आहे. राष्ट्रवादीकडे डझनभर नेते असले तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हाच राष्ट्रवादीचा निवडणूक चेहरा आहे. पक्षातील गळती, गटबाजी, हेवेदावे, दोन माजी महापौरांच्या ‘मनमानी’ कारभाराच्या विरोधातील तीव्र नाराजी, महापौर विरुद्ध राष्ट्रवादी अशी परिस्थिती व काहीसे गोंधळाचे वातावरण असताना अजितदादांनी सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये तळ ठोकून पुन्हा एकदा ‘निवडणूक चाचपणी’ केली. आगामी निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्दय़ावर लढवायची आहे, यावर शिक्कामोर्तब करतानाच विरोधक कशाही प्रकारे आरोप करतील, राजकारण करतील, तरीही प्रचारातून विकासाचा मुख्य मुद्दा सोडायचा नाही, असे त्यांनी सर्वाना निक्षून सांगितले, यावरून राष्ट्रवादीला गेल्या १० वर्षांतील विकासकामांचा मुद्दा ‘कॅश’ करायचा आहे, हे स्पष्ट होते.
पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून शहरात काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पालिकेचा कब्जा राष्ट्रवादीने घेतला. २००२ ते २००७ दरम्यान अजित पवार व रामकृष्ण मोरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसने मिळून पाच वर्षे कारभार केला. त्यानंतर २००७ आणि २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत मिळाले. तेव्हा विरोधक भुईसपाट झाले. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून िपपरी पालिकेच्या राजकारणात केवळ अजित पवारांचाच शब्द अंतिम मानला जातो. त्यांची एकाधिकारशाही म्हणा किंवा मनमानी, ते म्हणतील तसे या शहरात होत राहिले. त्यातून शहरातील विकासाची कामे वेगाने मार्गी लागली. भव्य, प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, उद्याने, विविध प्रकल्प, सुशोभीकरणाची व नागरी सुविधांची मोठी कामे झाली. बांधकाम क्षेत्राची भरभराट झाली, टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शहराचा पूर्णपणे कायापालट झाल्याचे चित्र अल्पावधीत उभे राहिले. रस्तारुंदीकरणासारख्या काही विषयांत झालेला तीव्र विरोध त्यांनी मोडून काढला. या सर्वाचे फलित म्हणून आजचे बदललेले पिंपरी-चिंचवड दिसते आहे. त्याची दखल घेतली गेल्यामुळेच ‘बेस्ट सिटी’, ‘क्लीन सिटी’सारखे पुरस्कार शहराला मिळाले.
एकीकडे, अशी परिस्थिती असली तरी अजितदादांच्या ‘बगलबच्च्यांनी’ पिंपरी पालिकेत सर्वच बाबतीत प्रचंड ऊतमात केला आहे, त्याला कोणतीही सीमा राहिली नाही. विकासाच्या नावाखाली ‘खाबूगिरी’ हीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची कार्यपद्धती राहिली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची बडे कंत्राटदार, ठेकेदारांशी भागीदारी आहे. राष्ट्रवादीचे ठराविक नेते दलालीचे काम करतात. बांधकाम व्यावसायिक, विकसक, कंत्राटदारांची नियमबाहय़ कामे ‘बसवून’ आणि ती ‘वाजवून’ देण्याची सुपारी ते घेतात. नियमांची ऐशीतैशी करून ते पूर्णत्वालाही नेतात. पालिकेला खड्डय़ात घालून सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीने स्वत:ची भरभराट करून घेतलेले अनेक ‘प्रगत’ ठेकेदार पाहिल्यानंतर, विश्वस्त म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांची री ओढत स्वत:च ठेकेदारी सुरू केली आणि ठेकेदारांपेक्षाही जास्त प्रमाणात पालिकेला चुना लावण्याचे काम त्यांनी केले. मोठे रस्ते, गल्लोगल्लीतील पदपथ, पाण्याचे मीटर, औषध तसेच उपकरणे खरेदी, सुशोभीकरण, फर्निचर खरेदी, पाणीपुरवठा, विद्युत व स्वच्छतेची कामे, पर्यावरणाची कामे, पुनर्वसन प्रकल्प, नदीसुधार, बचतगट, सल्लागार अशी कितीतरी कामे सांगता येतील, जिथे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, नगरसेवकांचे सरळसरळ आर्थिक हितसंबंध आहेत. बडे अधिकारी, सत्ताधारी नेते आणि ठेकेदारांचे संगनमत पालिकेच्या मुळाशी आले आहे. ‘श्रीमंत’ महापालिका म्हणून रुबाब असलेल्या िपपरी पालिकेतील कोटय़वधींच्या उधळपट्टीमुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. दहा वर्षांत राष्ट्रवादीने शहराचा भरीव विकास केला हे मान्य करतानाच राष्ट्रवादीने भ्रष्ट कारभाराचा कळसही गाठला, हेदेखील मान्य करावे लागेल. शहरविकासाचे शिल्पकार म्हणून अजित पवारांना श्रेय द्यायचे झाल्यास येथील भ्रष्ट कारभाराची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे. पिंपरी-चिंचवडच्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची ‘बित्तंबातमी’ अजितदादांना असते. मग वर्षांनुवर्षे सुरू असलेला स्वपक्षीयांचा ऊतमात त्यांना माहीतच नाही, असे मानता येणार नाही. फक्त राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी आणि बाकीचे धुतल्या तांदळासारखे आहेत, असे बिलकूल नाही. पूर्वी जे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत होते आणि आता नव्या पक्षात गेले, त्यांचेही हात भ्रष्ट कारभाराने बरबटलेले आहेत. ‘टीडीआर’चा धंदा हा केवळ राष्ट्रवादीची मक्तेदारी नव्हती आणि नाही. अनेक वर्षांपासून विरोधी पक्ष म्हणून जे कोणी मिरवतात, त्यांचा ‘मांडवली’ हाच धंदा आहे.
सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोंब ठोकायची, आंदोलने करायची आणि आपला हिस्सा पोहोचताच ‘शांतीचे धोरण’ ठेवायचे, ही विरोधी मंडळींची जुनीच कार्यपद्धती आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर तुटून पडणाऱ्या अनेक विरोधकांनी राष्ट्रवादीच्या मदतीनेच आपली तुंबडी भरल्याचे दाखले आहेत. पिंपरी पालिकेत विरोधक नावाला राहिलेत, त्याचे कारण म्हणजे विरोधी नेत्यांची दुकानदारी हीच मुळी राष्ट्रवादीच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीने फेकलेल्या तुकडय़ांवरच अनेक विरोधकांची रोजीरोटी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ या लढतीत वरकरणी काहीही असले तरी ‘अंदर की बात है, हम सब एक है’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.