अजित पवार यांचा पिंपरीत पक्षकार्यकर्त्यांशी संवाद
पिंपरी पालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर साडेचार महिने शहरात न फिरकणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पक्षमेळाव्याच्या निमित्ताने चिंचवडला हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड काम करूनही जनतेने नाकारले, याचे अतिशय दु:ख झाले, अशी भावना व्यक्त करतानाच, आम्ही इतके चांगले करून ठेवले असताना, आता शहराला वाली राहिला नाही. आम्ही विकास केला, ते शहर भकास करू लागले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पिंपरीत सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच शहरात आलेल्या अजित पवारांनी पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरीत जे काही यश मिळाले, त्याबद्दल सर्वाचे अभिनंदन आहे. पराभवाचे निश्चितपणे दु:ख आहे. निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडला येत नाही, यावरून वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात. अधिवेशन, संघर्ष यात्रा, आमदारांचे निलंबन अशा घटनांमध्ये बराच वेळ गेला. प्रचंड काम करूनही जनतेने नाकारले, याचे दु:ख वाटते. काही वर्षांपूर्वी या शहराचे चित्र काय होते. राष्ट्रवादीने सत्तेच्या माध्यमातून प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्यानांसह भरीव विकासकामे केली. शहर स्वंयपूर्ण केले. भविष्याच्या दृष्टीने पाण्याची पुरेशी सोय करून ठेवली. शहराचा कायापालट केला. तरीही आम्हाला नाकारण्यात आले, याच्या वेदना मनात आहेत. आपल्यापेक्षा कर्तबगार व्यक्तीकडे कारभार गेला असता तर बरे झाले असते. पिंपरीत सत्ताधाऱ्यांकडे सक्षम नेतृत्व नाही. प्रत्येकाचे ‘इंटरेस्ट’ वेगळे आहेत. अधिकारी यांचे ऐकत नाहीत. पालकमंत्री पुरेसा वेळ देत नाहीत. सत्ता मिळाली, पण स्वातंत्र्य मिळाले नाही. एकखांबी नेतृत्व नसल्याने एकहाती निर्णय होत नाही. कोणी कोणाचे ऐकत नाही. सभागृह व्यवस्थित चालवले जात नाही. भ्रष्ट कारभार सुरू आहे. पिंपरीतील भ्रष्टाचाराची तक्रार आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रवादीवर चिखलफेक करणाऱ्यांवरच आज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ज्यांनी घरे मिळू दिली नाही. तेच आता घरे देण्याची भाषा करतात, ही जनतेची दिशाभूल आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना वर्तुळाकार मार्गाचा (िरगरोड) अट्टाहास का आहे, नियोजित मार्गावर रस्त्याच्या कडेला कोणी जमिनी घेतल्या आहेत का, कोणाचे शॉिपग मॉल होणार आहेत का, हे शहराच्या जनतेला कळले पाहिजे, असे पवार म्हणाले.
यातना आणि शल्य
ज्या शहरावर अतोनात प्रेम केले, तेथे नाकारण्यात आल्याचे शल्य अजित पवारांच्या मनात होते, त्यामुळेच ते शहरात येत नव्हते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितले. आपण एकसंधपणाने निवडणुकांना सामोरे गेलो नाही. गटतट विसरलो असतो तर बहुमत दुसरीकडे जाण्याचे काहीच कारण नव्हते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.