गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेली संततधार आणि दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. दापोडीत रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. शहरात नदीपात्रालगतच्या वसाहतीत पाणी शिरले. चिंचवडचे मोरया मंदिर तसेच थेरगावच्या केजुबाई मंदिरात पूरसृदृश परिस्थिती निर्माण झाली. दिवसभर पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनस्वारांचे प्रचंड हाल झाले.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रात्री विश्रांती न घेतल्याने सकाळपासून जागोजागी पाणी साचल्याचे दिसून आले. पवना नदी दुथडी भरून वाहात असल्याने पात्रालगतच्या घरांमध्ये विशेषत: सांगवी, पिंपळे गुरव, फुगेवाडी, पिंपरी, चिंचवड, दिघी आदी भागात पाणी शिरले. फुगेवाडीतील पात्रालगतच्या िनबोळे वसाहतीत पाणी शिरले होते. त्याकडे कोणीच लक्ष न दिल्याने रहिवाशी संतापले होते. सांगवीतील मुळानगर भागात पाणी शिरल्याने रहिवाशांना डोहीचा वापर करून बाहेर काढावे लागले. दापोडीत रेल्वे रुळांवर पाणी साचले होते, त्यामुळे रेल्वेगाडय़ा संथगतीने जात होत्या. चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयाजवळ झाड रस्त्यावरच पडले. चिंचवडचे मोरया गणपती मंदिर पाण्याखाली आले. त्याचप्रमाणे, केजुबाई बंधाऱ्यातही पूरसदृश परिस्थिती झाली. पिंपरी पालिकेच्या ग्रेडसेपरेटरमध्ये पाणी साचल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, त्याचा मोठा फटका महामार्गाच्या वाहतुकीला बसला. आतील मार्गावरून होणारी वाहतूक महामार्गावर आली. बीआरटीमुळे मुळातच रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली आहे. त्यात ग्रेडसेपरेटरद्वारे होणारी वाहतूकही महामार्गावर आल्याने प्रचंड कोंडी झाली. महापालिकेच्या मुख्यालयासमोरच कासवगतीने दिवसभर वाहतूक होत होती. शहरातील विविध भागात रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरूच होता.
वसाहतींमध्ये शिरलेले पाणी आणि वाहतूक कोंडीचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. रमा ओव्हाळ, आशा शेंडगे, सुनीता वाघेरे, सद्गुरू कदम यांनी प्रशासनाला जाब विचारला. अधिकारी तसेच विभागांमध्ये परस्पर समन्वय नाही आणि ते एकमेकांवर जबाबदारी ढकलतात, त्याचा परिणाम कामावर होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. आयुक्त राजीव जाधव यांनी दखल घेत यापुढे समन्वय राखला जाईल, अशी ग्वाही दिली.
उद्योगनगरीतील जनजीवन विस्कळीत
संततधार आणि दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.
First published on: 31-07-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disrupt rain monsoon traffic