माजी जिल्हा शल्यचिकित्सक व औंध रुग्णालयाचे माजी प्रमुख डॉ. विनायक मोरे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीच्या विरोधात डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल’कडे (मॅट) दाद मागितली आहे. काहीच दिवसांपूर्वी अतिरिक्त मुख्य सचिवांकडून काम चांगले असल्याची पावती मिळूनही अचानक कनिष्ठ पदावर बदली होण्याचे कारण काय, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. मोरे यांची जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून सहायक संचालक या कनिष्ठ पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या निवृत्तीला केवळ पाच महिने उरले असताना ही बदली झाली आहे. याबाबत त्यांनी आक्षेप घेतले असून, त्याच्या विरोधात दाद मागितली आहे.
मोरे यांची बदली आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दबावामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी जगताप आणि मोरे यांच्यात औंध जिल्हा नागरी रुग्णालयाच्या कारभारावरून जोरदार वादावादी झाली होती. रुग्णालयाच्या कारभारात अनागोंदी असल्याचा दावा जगताप यांनी केला होता. या वेळी जगताप रुग्णालयात येऊन दमदाटी करत असल्याचे सांगत मोरे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा मोरे यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे कारण नाही, असे सांगून अतिरिक्त मुख्य सचिवांनी त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तरीसुद्धा काही दिवसांतच मोरे यांची बदली झाली असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत मोरे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘बदलीच्या कारवाईविरोधात मी मॅटकडे न्याय मागितला असून या प्रकरणाचा निकाल लागल्यावर त्यामागचे कारण स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.’
तडकाफडकी बदलीच्या विरोधात डॉ. मोरे यांची ‘मॅट’ कडे दाद
औंध रुग्णालयाचे माजी प्रमुख डॉ. विनायक मोरे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीच्या विरोधात डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल’कडे (मॅट) दाद मागितली आहे.
First published on: 19-07-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr more expects justice from maha admn tribunal