सत्ताधारी माणसांचे शिक्षणापासून व्यापारापर्यंत सर्वच बाजूने सर्वच क्षेत्रामध्ये आक्रमण झाल्याने सामान्य माणसाची कोंडी झाली असून सामान्याला त्याचा आवाज राहिला नाही. त्यातून निर्माण झालेल्या भयप्रद अवस्थेमुळे साहित्य व वृत्तपत्रसृष्टीचा खूप मोठा संकोच होतो आहे. बौद्धिक विश्वाचा असा संकोच होणे, ही समाजाला भूषणावह गोष्ट नाही, असे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय समाज, साहित्य आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानात कोत्तापल्ले बोलत होते. पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, पत्रकार संघाचे सरचिटणीस गजेंद्र बडे, उपाध्यक्ष शैलेश काळे या वेळी उपस्थित होते.
ते म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य ही जागतिक पातळीवरील महत्त्वाची गोष्ट होती. पण, या स्वातंत्र्याचे प्रतिबिंब साहित्यात फारसे पडले नाही. १९७० नंतर दलित, ग्रामीण, स्त्री साहित्याच्या चळवळी आल्या. त्यातून मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारण्याचा आग्रह झाला. पण, एकूण साहित्यात स्वातंत्र, समता, बंधुता आदी मूल्य मोठय़ा प्रमाणावर लेखकांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आली नाहीत. काही अपवाद वगळता मराठी लेखकांना वैयक्तिक जीवनातील भूतकाळ महत्त्वाचा वाटतो. राजकारणावर मोठय़ा प्रमाणावर लेखन होत नाही. अरुण साधू, भानू काळे आदी अपवाद सोडले, तर राजकीय जाणीव तीव्रपणे व्यक्त करणारे लेखन झाले नाही.
पत्रकारितेबाबत ते म्हणाले, ध्येयवादी प्रवृत्ती व समाजजागृती वृत्तपत्राने स्वीकारल्या, पण कमी झाल्या. १९ व्या शतकातील मूळ प्रेरणा कमी झाल्या. सन १९७० नंतर सत्ताधारी माणसांचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात हस्तक्षेप सुरू झाला. सत्ताधारी शिक्षण क्षेत्रात आले. वर्तमानपत्रेही त्यांनी काढली. व्यापारातही ही मंडळी आली. सर्वच क्षेत्रांमध्ये सत्ताधाऱ्यांना सत्ता हवी असून, हे चित्र गंभीर आहे. त्यामुळे तुम्ही काय बोललात, लिहिलेत व कितीही पळण्याचा प्रयत्न केला, तर सत्ताधारी कुठेही डोक्यावर असतो. त्यातून निर्माण झालेल्या भयप्रद अवस्थेमुळे साहित्य व वृत्तपत्रसृष्टीचा संकोच होत आहे. हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही.
श्रद्धा चमके यांनी आभार प्रदर्शन केले.
 
‘आयटम साँग’ अन् लोकप्रिय लेखन..!
लोकांना झडझडून जागे करणारे लेखन होत नसल्याची खंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. त्याबाबत ते म्हणाले, केवळ लोकप्रिय लेखन होते आहे. एखादा चित्रपट चालण्यासाठी लोकांना आवडणाऱ्या त्यात कोणत्या गोष्टी असाव्यात, याचा विचार केला जातो. चित्रपट चालण्यासाठी त्यात एखादे आयटम साँग घेतले जाते. त्याचप्रमाणे लोकांना काय आवडते, असा विचार आता लेखनातही होत असून, त्यानुसार लोकप्रिय लेखन केले जाते.

Story img Loader