मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी दिलेली आश्वासने व घोषणा फसव्या असून राजीनाम्याची भाषा करणारे आमदार स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार यांनी केली. अजितदादांनी पिंपरी-चिंचवडचा ठेका घेतलेला नाही, असे सांगत अनधिकृत बांधकामप्रकरणी स्थापन केलेली मंत्र्यांची समिती ‘टाईमपास’ आहे, असेही पवारांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या खिसेभरू धोरणामुळे शहरात अनधिकृत बांधकामे वाढली. नियमावली किचकट असल्याने नागरिकांनी विनापरवाना घरे बांधली, तेव्हा याच मंडळींनी पैसे खाऊन अनधिकृत बांधकामांच्या वाढीस हातभार लावला. आता नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे व दिशाभूल करण्याचे काम दोन्ही काँग्रेसने चालवले आहे. पाडापाडीची वेळ आयुक्तांवर आली, त्यास सत्ताधारीच कारणीभूत आहेत. अनधिकृत बांधकामांचे पाप आयुक्तांच्या माथी मारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असून त्यांची बदली झाली तरी प्रश्न कायमच राहणार आहे. हा प्रश्न आठ दिवसात न सुटल्यास तीव्र आंदोलन करू, मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा पवार व शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिला आहे. महायुतीची सत्ता येणार असल्याने पहिल्या अधिवेशनातच हा प्रश्न निकाली लावू, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader