लोकसभेमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारा कारभारी कोण असेल, याचे उत्तर शुक्रवारी (१६ मे) दुपापर्यंत मिळणार आहे; जो निवडून येईल तो नवा खासदार असेल हे मात्र नक्की. काँग्रेस पक्ष आपली विजयाची दावेदारी कायम ठेवणार की भाकरी फिरवून मतदार भाजप-शिवसेना महायुतीचे कमळ फुलविणार या शक्यता आहेतच, त्याचबरोबर रेल्वे इंजिनाची किती वेगाने धावणार आणि ‘आप’च्या झाडूमुळे नेमकी कोणाची सफाई होणार या विषयीच्या उत्कंठेलासुद्धा पूर्णविराम मिळणार आहे.
पुणे मतदार संघात काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम, भाजपचे अनिल शिरोळे, मनसेचे दीपक पायगुडे आणि आम आदमी पार्टीचे प्रा. सुभाष वारे यांच्यासह तब्बल २९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्षांची संख्या मोठी आहे. उमेदवारांची इतकी मोठी संख्या, निवडणूक आयोगाने लागू केलेली विविध कागदपत्रांच्या पूर्ततेची बंधने आणि वाढलेले मतदान यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास चार वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, दुपारनंतर साधारणपणे कल ध्यानात येऊ शकेल. शुक्रवारी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामामध्ये पुणे आणि बारामती, तर बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.
पुण्यामध्ये २९ उमेदवार असल्याने मतमोजणीला वेळ लागणार आहे. त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे मतमोजणी फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनेक कागदपत्रे आणि अहवाल देण्याची बंधने घातली आहेत. एका विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आणि पडताळा प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक आयोगाला अहवाल सादर केल्यानंतरच पुढच्या फेरीतील मतदानयंत्रे मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात येणार आहेत. हे होईपर्यंत प्रत्येक फेरीसाठी साधारणपणे २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होण्याचा कालावधी वाढणार आहे. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी २० फेऱ्या होतील. पर्वतीमध्ये २४, कोथरूडमध्ये २५ तर वडगाव शेरीमध्ये २९ फेऱ्या होणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी १३५० कर्मचाऱ्यांसह अन्य अधिकारी मिळून दीड हजार जण सहभागी होणार आहेत.
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीला (मावळ मतदार संघ) या वेळी नवा खासदार मिळणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे, शेकापचे लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर आणि ‘आप’चे मारुती भापकर रिंगणात आहेत. तिथे कोणीही निवडून आले तरी उद्योगनगरीलाही नवा खासदार मिळेल.
– पुणे, पिंपरी-चिंचवडला नवा खासदार मिळणार
लोकसभेमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारा कारभारी कोण असेल, याचे उत्तर शुक्रवारी (१६ मे) दुपापर्यंत मिळणार आहे; जो निवडून येईल तो नवा खासदार असेल हे मात्र नक्की.
आणखी वाचा
First published on: 16-05-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election result mp pune