एकच नाव असलेले दोन मतदार.. दोघांचा पत्ताही एकच.. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र किंवा फोटो व्होटर स्लिप यापैकी एक ओळखीचा पुरावा दोन्ही मतदारांकडे.. मतदानाला आल्यावर आपले मतदान आधीच झाल्याचे समजते तेव्हा आपल्यालाही हा हक्क मिळावा ही दुसऱ्या मतदाराची मागणी पूर्ण करण्यात आली. निवडणूक आयागाने अशा मतदारांना प्रदत्त मतदानाचा अधिकार प्रदान करून त्यांचे मतदान पारंपरिक मतपत्रिकेद्वारे करून घेतले.
पर्वती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय येथे गुरुवारी एकच नाव असलेले दोन मतदार दत्त म्हणून हजर असल्याच्या तीन घटना घडल्या. या मतदान केंद्रामध्ये शेजारील तीन खोल्यांमध्ये प्रत्येकी एका मतदाराला या अनुभवाला सामोरे जावे लागले. मतदानाला आल्यानंतर आपले मतदान झाले असल्याचे समजल्यावर तेच नाव असलेल्या दुसऱ्या मतदारानेही आपल्या हक्काची मागणी केली. अखेर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रदत्त मतदानाचा अधिकार बहाल करून त्यांचे मतदान करून घेण्यात आले. पारंपरिक मतपत्रिकेवर शिक्का उमटविलेल्या या मतपत्रिका स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या. या मतपत्रिकांची स्वतंत्र मतमोजणी होणार असल्याची माहिती या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मोहन दत्तात्रेय वैद्य (वय ६५, रा. ज्ञानेश्वरी प्रसाद, सहकारनगर क्रमांक २) हे दुपारी साडेबाराच्या सुमारास मतदानासाठी आले. तुमचे मतदान आधीच झाले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हादेखील बरोबर असल्याने आधी आलेल्या मोहन वैद्य यांना मतदान करू देण्यात आले. नंतर आलेल्या वैद्य यांचे प्रदत्त मतदान झाले.
तारामती नामदेव नाईक (वय ७१, रा. लक्ष्मीनगर) यांच्या नावाचे मतदान सकाळी आठ वाजताच झाले होते. आधी आलेल्या तारामती नाईक यांच्या मतदानास काँग्रेस उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला होता, मात्र यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदार ओळखपत्र या बाबींची तपासणी करूनच त्यांना मतदान करू दिले गेले. मतदानासाठी नंतर आलेल्या तारामती शिंदे यांचे शिक्का मारून मतदान झाले. याच परिसरातील प्रवीण बाबुराव साळुंके यांचे मतदान आधीच झाले होते. सकाळच्या वेळात आलेल्या प्रवीण साळुंके यांनी फोटो व्होटर स्लिप दाखवून मतदान केले, मात्र त्यांनी मतदाराच्या सहीऐवजी अंगठा दिल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने सांगितले.
एकाच घरातील मतांची विभागणी
मतदारयादीतील घोळाचा फटका अनेक मतदारांना बसला. एकाच घरातील चार मतांची विभागणी झाल्याने किबे कुटुंबीयांना मनस्ताप भोगावा लागला. मी, माझे वडील विजय किबे आणि भाऊ शंतनू किबे अशा आम्हा तिघांचे मतदान एसएनडीटी या मतदान केंद्रावर होते. तर, आई सुमन किबे हिचे एकटीचे मतदान डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल येथे होते, अशी माहिती इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या शिल्पा किबे यांनी दिली. कलमाडी हायस्कूल येथील केंद्रावर जाऊन आईने सकाळी लवकरच मतदान केले खरे. पण, त्या खोलीमध्ये कोणतेही बटन दाबले तरी मत एकाच उमेदवाराला जात असल्याचे ध्यानात येताच आक्षेप घेण्यात आला. अतिरिक्त साठय़ामध्ये असलेले कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट बदलण्यात आले. तासभराने पुन्हा तेथील मतदान सुरू झाले. पहिल्या मतदारांना पुन्हा मतदान करू देण्यात येणार असल्याचे समजले म्हणून मी चौकशीसाठी आले, पण कोणीही नीटपणाने माहिती देत नाही, असेही शिल्पा किबे यांनी सांगितले.
एकाच नावाच्या दोन व्यक्तींना मिळाला मतदानाचा हक्क
एकच नाव असलेले दोन मतदार.. दोघांचा पत्ताही एकच.. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र किंवा फोटो व्होटर स्लिप यापैकी एक ओळखीचा पुरावा दोन्ही मतदारांकडे...
आणखी वाचा
First published on: 18-04-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election voter name proof