पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे व सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी या टप्प्यामध्ये विद्युत इंजिनच्या माध्यमातून एक्स्प्रेस गाडय़ांच्या सेवेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून आता इंधनावर चालणारे इंजिन इतिहासजमा झाले. त्या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

खासदार अनिल शिरोळे तसेच रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांनी म्हैसूर-निजामुद्दीन सुवर्ण जयंती एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुणे-दौंड मार्गावरील विद्युत इंजिनच्या गाडय़ांच्या सेवेची सुरुवात केली. त्या वेळी इतर अधिकारी त्याचप्रमाणे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मागील तीनचार वर्षांपासून सुरू होते. अनेक तांत्रिक अडचणींमुळे या कामाला उशीर झाला. मात्र, मागील महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. तांत्रिक समितीनेही या कामाची तपासणी करून हिरवा कंदील दिला. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात विद्युत इंजिन चालवून चाचण्याही घेण्यात आल्या. त्यामुळे गुरुवारपासून या मार्गाने जाणाऱ्या सर्वच गाडय़ा आता विद्युत इंजिनावर धावणार आहेत. विद्युत इंजिनामुळे या टप्प्यातील प्रवासाचा वेळ कमी होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत पुणे ते दौंड अशी लोकल सेवाही सुरू करता येणार आहे.

 

 

Story img Loader