एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे काँग्रेस टिकाव धरू शकली नाही, अशी खंत कार्यकर्ते वेळोवेळी व्यक्त करत होते. मात्र, मोरे यांच्या काळात शहराचे निरीक्षक असलेले इंटकचे अध्यक्ष व आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी तीच भावना व्यक्त केली. रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीतील काँग्रेस संपली, असे ते म्हणाले.
नगरसेवक कैलास कदम यांनी आयोजित केलेल्या इंटक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी छाजेड पिंपरीत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरसेवक कदम, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे आदी उपस्थित होते. पवारांचा प्रभाव असतानाही मोरे यांनी काँग्रेस जिवंत ठेवली होती. पवारांना टक्कर देत राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्याची किमया मोरे यांनी दाखवली होती. तथापि, मोरे यांच्या निधनानंतर शहर काँग्रेस पोरकी झाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. अगदी तीच भावना छाजेड यांनी सोमवारी व्यक्त केली. मोरे शहर काँग्रेसचे कारभारी असताना छाजेड निरीक्षक होते. त्यांनी मोरे यांच्या कामाची पध्दत पाहिली होती. त्यावरून सध्याची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे त्यांनी या विधानाद्वारे सूचित केले. कैलास कदम यांच्याविषयी औद्योगिक क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी यापूर्वी केली होती. तो आरोप छाजेड यांनी फेटाळून लावला. कदम यांचे काम चांगले असून नढे यांना या क्षेत्रातील काहीही माहिती नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader