पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागात लाखो रूपये खर्च करून भव्य अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. अजूनही कमानी टाकण्याची चढाओढ सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. कमानींवरून होणारे वाद, वाहतुकीला अडथळे, संभाव्य अपघाताचे धोके पाहता अनेकांच्या दृष्टीने हा विषय अडचणींचा आहे. दुसरीकडे, पालिकेकडे वस्तुस्थिती दर्शवणारी माहितीच उपलब्ध नसल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

शहरातील अनेक भागांत कमानी आहेत आणि अनेक ठिकाणी कमानी टाकण्याचे नियोजन सुरू आहे. एका कमानीसाठी २५ ते ५० लाख रूपयांपर्यंत खर्च अपेक्षित धरण्यात येतो. हमरस्ते, चौकात तसेच वेळप्रसंगी एखाद्या अडचणीच्या ठिकाणी देखील कमान टाकण्यात आली आहे. प्रवेशद्वाराला नाव कोणाचे द्यायचे, यावरून वाद झाले आहेत. अशाच वादातून भोसरी-लांडेवाडी चौकात सुरू असलेले कमानीचे काम कित्येक वर्षांपासून पूर्ण होऊ शकलेले नाही.

chart

पालिकेच्या नोंदीनुसार, शहरात केवळ १६ कमानी आहेत व त्यासाठी सव्वा दोन कोटी रूपये खर्च झाले आहेत. मात्र, ही माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याची शंका  व्यक्त करण्यात येते. तसेच, या माहितीतही विरोधाभास आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एकाच कमानीसाठी ४६ लाख रूपये खर्च झाला आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील एका कमानीसाठी ३४ लाख रूपये खर्च झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्याचवेळी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील तीन कमानींसाठी १९ लाख व ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांमधील चार कमानींसाठी २८ लाख रूपये खर्च झाल्याची नोंद आहे. कमानींची उपयुक्तता किती असते, याचे उत्तर मिळत नाहीत. पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्यातील सोयीस्कर युतीतून असे प्रस्ताव पुढे येतात. लाभ मिळतो म्हणूनच कमानीचे प्रस्ताव पुढे येतात का, अशी शंका घेण्यास जागा आहे.

 

Story img Loader