कचऱ्यावर ‘ओडोफ्रेश’ दरुगधीनाशक फवारणी करण्याच्या कामात गोलमाल केल्याचे पुराव्यानिशी उघड झाल्यानंतरही पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अभय दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. इतर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणाऱ्या आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वरदहस्त असलेल्या कुलकर्णींना फक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे.
पावसाळ्यात कचरा कुजण्याची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने मोशी कचरा डेपो परिसरात दरुगधी पसरत असल्याचे सांगत पर्यावरण विभागाने दरुगधीनाशक रसायनांची फवारणी करण्याचा घाट घातला. घाईने निविदा मागवून ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून अटी निर्धारित केल्या. एकाच कंपनीचे उत्पादक व व्रिक्रेते असलेल्या तीन पुरवठाधारकांच्या निविदा संगनमताने भरण्यात आल्या. कामगार पुरवठा करणाऱ्या कंपनीला रसायन पुरवठादार म्हणून पात्र ठरवण्यात आले. स्पर्धा झाल्याचे दाखवून पर्यावरण विभागाने २५ लाखाचे काम ठरवून ‘रूतू बायो सिस्टीम’ कंपनीला दिले. २४० लीटर रसायनाची आवश्यकता असताना कंत्राटदाराच्या हितासाठी १,२७५ लीटर रसायनाची खरेदी केली, त्यामुळे पालिकेवर १७ लाख ५० हजार रुपयांचा बोजा पडला. नगरसेविका सीमा सावळे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानुसार, आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. तब्बल सहा महिने लोटल्यानंतर आयुक्तांनी कुलकर्णी यांना केवळ ताकीद दिली आहे. याशिवाय, पर्यावरण विभागातील अन्य प्रकरणातही कुलकर्णी दोषी आढळून आले आहेत. मात्र, त्यांच्यावर सत्तारूढ राष्ट्रवादीच्या धंदेवाईक नेत्यांचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर तकलादू कारवाई करण्यात आल्याचे सावळे यांनी म्हटले आहे.