लडाख येथील डोंगररांगा, आच्छादित हिमशिखरे, दुर्गम रस्ते, लष्काराचे खडतर जीवन, बौद्ध भिक्षुकांची संस्कृती, अंग गोठवणारी थंडी आदींचा स्वत: अनुभव घेत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी तेथील निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे. त्यातील निवडक प्रकाशचित्रांचे प्रदर्शन १३ ते १६ जून दरम्यान चिंचवड येथे भरवण्यात आले असून ते सर्वासाठी विनामूल्य आहे.
पिंपरी महापालिकेचे छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर व त्यांच्या पत्नी वर्षां कशाळीकर यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. देवदत्त कशाळीकर यांनी लडाख येथे काही काळ वास्तव्य करून तेथील संस्कृती, निसर्गाचा अभ्यास केला. खडतर प्रवास करून त्यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. चिंचवडच्या मोरया मंदिराशेजारील यात्री निवास सभागृहात हे प्रदर्शन होणार असून ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, क्रीडा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर उपस्थित राहणार आहेत. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षां कशाळीकर यांनी चित्रांसाठी शब्दांकन केले आहे.

Story img Loader