पिंपरी महापालिकेने पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी लाखो रूपये खर्चून नव्या मोटारी खरेदी करण्याचा सपाटा लावल्याचे चित्र पुढे आले आहे. महापौर मोहिनी लांडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह तीन अभियंत्यांनाही नव्याने मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत.
महापौरांच्या दिमतीला आधीच दोन मोटारी असताना १५ लाखाची नवीन ‘करोला’ ही मोटार खरेदी करण्यात आली आहे. ताफ्यातील मोटारी सतत नादुरुस्त होत असतात, त्यामुळे अनेकदा गैरसोय होत असल्याचे सांगत महापौर लांडे यांनी नव्या मोटारीची मागणी प्रशासनाकडे केली होती. तथापि, नऊ लाखापर्यंतच खर्चाचे अधिकार महापालिकेला होते. तथापि, शासनाच्या सुधारित आदेशानुसार ही मर्यादा १५ लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्यानुसार, महापौरांनी नव्या मोटारीची हौस पूर्ण केली असून आवडीच्या ‘सात’ या क्रमांकासाठी वेगळे १५ हजार रूपये खर्च केले आहेत.
याशिवाय, नवे अतिरिक्त आयुक्त शिंदे यांच्यासाठी पालिकेने नवीन मोटार घेतली असून सहशहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता वसंत काची व मकरंद निकम यांच्यासाठी ‘टाटा मांझा’ ही मोटार खरेदी करण्यासाठी १८ लाख रूपये खर्चास नुकतीच मंजुरी दिली आहे. अभियंत्यांच्या मोटार खरेदीसाठी अजब युक्तिवाद करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांच्या मोटारी जुन्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. जलनिस्सारण विभागातील काम आरोग्याशी संबंधित व संवेदनशील आहे. नादुरुस्त मोटारींमुळे कामकाजात अडचण होत असल्याचा विचार करून नवीन वाहने खरेदी करावीत, असा प्रस्ताव होता, त्यास नुकतीच मंजुरीही देण्यात आली आहे.
पिंपरीत महापौर, अतिरिक्त आयुक्तांसह तीन अभियंत्यांसाठी आलिशान मोटारी
महापौर मोहिनी लांडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह तीन अभियंत्यांनाही नव्याने मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत.
First published on: 12-07-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expensive cars for pimpri mayor additional commissioner and 3 engineers