पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या शारदा बाबर, सीमा सावळे व आशा शेडगे या तीन नगरसेविकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा उपनेते शशिकांत सुतार यांनी बुधवारी केली. या तीनही नगरसेविका खासदार गजानन बाबर यांच्या समर्थक आहेत. मावळातील पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शेकाप व मनसेचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा प्रचार करत असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली.
मावळसाठी इच्छुक असलेल्या बाबरांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली. तेव्हा बाबरांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला. बाबर समर्थक पदाधिकाऱ्यांनी तीच भूमिका घेतली. तथापि, या तीन नगरसेविका पक्षातच राहिल्या. गजानन बाबर यांनी उघडपणे लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जगतापांच्या प्रचाराचे काम सुरू केले. त्यात सावळे, शेडगे व शारदा बाबर सहभागी होत असल्याची तक्रार बारणे तसेच सुतार यांनी वरिष्ठांकडे केली. त्यानुसार, ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव अनिल देसाई यांनी पक्षविरोधी प्रचार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली. यामुळे पिंपरी पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ १४ वरून ११ झाले आहे. त्यांचा गट मनसेशी सलग्न राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
दरम्यान, ही कारवाई अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया सावळे, बाबर व शेडगे यांनी पत्रकारांना दिली. निष्ठावान सैनिक व बाहेरून आलेले यांच्यातील ही लढाई आहे. त्यांच्या वागणुकीला कटाळून अनेकांनी पक्ष सोडला, अजूनही बरेच त्या मनस्थितीत आहेत. बारणेंनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासून कामाची जबाबदारी मिळेल म्हणून वाट पाहिली. मात्र त्यांनी प्रचारात सहभागी करून घेतले नाही. २०१२ मध्ये शिक्षण मंडळ निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक फुटल्याने पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्यामागे बारणे व सुलभा उबाळे यांचेच राजकारण होते. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, आमच्यावर पक्षविरोधाचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली, असे सावळे यांनी म्हटले आहे.

Story img Loader