पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज करताना गेल्या एका वर्षांतील आपल्या निवासाचा पत्ता अचूक लिहिणे आवश्यक असल्याचे पारपत्र खात्यातर्फे कळवण्यात आले आहे. निवासी पत्त्यांविषयी परिपूर्ण व अचूक माहिती न देणाऱ्या पारपत्र अर्जदारांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तसेच अशा अर्जदारांना पारपत्र उशिरा मिळण्याची किंवा नाकारले जाण्याचीही शक्यता वाढते, अशी तंबी खात्याने दिली आहे.
शिक्षण वा कामानिमित्त आपल्या मूळच्या पत्त्यावर न राहणारे बहुसंख्य नागरिक त्यांच्या पारपत्र अर्जात मूळ पत्ता लिहितात परंतु सध्याचा पत्ता लिहिणे विसरतात. त्यामुळे पारपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नागरिकांनी परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन पारपत्र अधिकारी नरेंद्र सिंग यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
पारपत्रासाठी अर्ज करताना खोटी माहिती देणे किंवा माहिती लपवणे हा पारपत्र कायदा १९६७ अनुसार गुन्हा ठरतो. त्यामुळे अर्जदारांनी गेल्या एका वर्षांत आपण ज्या-ज्या पत्त्यांवर सलग मुक्काम केला आहे ते सर्व पत्ते अर्जात नमूद करणे आवश्यक असून एखाद्या पत्त्यावर अर्जदार काही महिनेच राहिला असेल, तरीही तो पत्ता अर्जात लिहिणे आवश्यक असल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
—-चौकट—-
प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी..
– गेल्या बारा महिन्यांतील आपले राहण्याचे सर्व पत्ते अर्जात नमूद करा
– मूळच्या पत्त्याबरोबरच सध्याचा पत्ताही अचूक लिहा
– अर्जदाराच्या सध्याच्या निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून चालू बँक खात्याचे बँक स्टेटमेंट किंवा शासकीय मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या अधिकृत लेटरहेडवरील स्वाक्षरीकृत पत्रासह विद्यार्थी प्रमाणपत्र किंवा नोकरदार म्हणून कंपनीच्या अधिकृत लेटरहेडवरील प्रमाणपत्र अर्जाबरोबर सादर करता येईल.