इटालियन बनावटीची दोन पिस्तुले बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. खराडी भागात ही कारवाई करण्यात आली.
नियाज अहमद फारुख मदारी (वय २४, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मदारी खराडीतील रिलायन्स मार्टशेजारी पिस्तूल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित धुमाळ व समीर शेख यांना गुरुवारी (२७ ऑक्टोबर) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावला आणि मदारीला पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली पिस्तुले परदेशी बनावटीची असल्याचे निष्पन झाले आहे. त्याने पिस्तूल कोठून आणली तसेच तो पिस्तुलांची कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, हवालदार धुमाळ, शेख, पंडित गावडे, अविनाश शिवशरण, सचिन कोळी, परशुराम शिरसाट यांनी ही कारवाई केली. मदारीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.