अंदाजपत्रकातील तरतुदी आणि अधिकारी वर्गाच्या वर्तवणूकीवर घेतले आक्षेप
पवनेच्या प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी २१ माजी नगरसेवकांच्या गटाने आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमवेत बैठकीसाठी वेळ घेतली. प्रत्यक्षात प्रदूषणाचा विषय दूरच राहिला. प्रत्येकाने आपापल्या भागातील नागरी समस्यांचा पाढाच आयुक्तांसमोर वाचला. सर्वाचे ऐकून घेत उशीर झाल्याचे कारण देत आयुक्तांनी बैठकीत कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.
माजी नगरसेवकांचे नेते श्याम वाल्हेकर यांच्या पुढाकाराने सोमवारी आयुक्तांसमवेत माजी नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, सुमन पवळे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे आदी उपस्थित होते. आयुक्तांनी बैठकीसाठी १५ मिनिटांची वेळ दिली होती, मात्र चर्चेचे विषय लांबत गेल्याने तासभर बैठक चालली. आयुक्तांना शहराचा इतिहास सांगण्यात आला. बंदनळ योजना, आरोग्य सेवा, अंदाजपत्रकातील तरतुदी, सांडपाणी व्यवस्थापन, नियोजनशून्य कारभार आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. अधिकाऱ्यांना शिस्त नाही, कारभारात नियोजन नाही, बजेट खर्च होत नाही, नाल्यांची वरवर सफाई होते, अशा अनेक मुद्दय़ांकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले.
आयुक्तांनी सर्वाचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, पुढील बैठकीसाठी जायचे असल्याने यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

Story img Loader