पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे (वय-७५) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. पिंपरी पालिकेचे नगरसेवक अतुल शितोळे हे त्यांचे पुत्र होत. सांगवीतील स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘नाना’ या नावाने सर्वपरिचित असलेले शितोळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील बडे प्रस्थ होते. पीएमटीचे सदस्य, पिंपरी पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, पूर्वाश्रमीची काँग्रेस व नंतरच्या राष्ट्रवादीचे पिंपरी शहराध्यक्ष, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, माजी महापौर संघटनेचे समन्वयक अशी विविध पदे त्यांनी भूषवली. भिकू वाघेरे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर (१९८७-८८) या वर्षी ते महापौर झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते. अजितदादांचा शहरातील राजकारणातील उदय होण्यापूर्वी पिंपरी पालिकेचे शितोळे हेच कारभारी व सत्ताकेंद्र होते. नंतरच्या काळात अजित पवार व रामकृष्ण मोरे यांच्यात बेबनाव असताना त्यांच्यातील दुवा म्हणून तेच काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. औंध येथील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी सांगवीत अंत्यविधी करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे निधन
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे (वय-७५) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.
आणखी वाचा
First published on: 19-07-2014 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mayor nanasaheb shitole passed away