नाटय़गृहांचे नेटके व्यवस्थापन हवे 

पिंपरी-चिंचवड शहरातील चौथे नाटय़गृह वाजतगाजत सुरू झाले. आधीच्या तीनही नाटय़गृहांची अवस्था ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी आहे. नाटय़गृहांवर होणारा अवास्तव खर्च व तेथून मिळणारे उत्पन्न हे न जुळणारे समीकरण आहे. नाटय़गृहांचे व्यवस्थापन योग्य रीत्या होत नाही. कलावंत, प्रेक्षक यांनी सातत्याने तक्रारी करूनही त्याचा उपयोग होत नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून नाटय़गृहे बांधायची आणि पुढे त्याची निगा राखायची नाही, ही परंपरा पिंपरी महापालिकेने जपली आहे. नव्या सांगवीतील बराच काळ रखडलेले निळूभाऊ फुले नाटय़गृह सुरू झाले असताना निगडी प्राधिकरणात अशाच प्रकारे आणखी एका भव्यदिव्य अशा ‘गदिमा’ नाटय़गृहाचे काम रडतखडत सुरू आहे. नाटय़गृहे सुरू करताना त्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन व्हायला हवे, पुढचं पाठ, मागचं सपाट असे होता कामा नये.

ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य
savitribai phule pune university diamond jubilee celebration
शहरबात : विद्यापीठ प्राधान्यक्रम कधी ठरवणार?

नवी सांगवी येथील ‘नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिर’ अखेर एकदाचे मार्गस्थ झाल्याने उद्योगनगरीतील रसिक प्रेक्षकांसाठी आणखी एक मध्यवर्ती नाटय़गृह उपलब्ध झाले आहे. या सुसज्ज नाटय़गृहास निळूभाऊंचे नाव दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पिंपरी पालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. अनेक वादविवाद, विरोध आणि इतर नाटय़मय घडामोडींमुळे नाटय़गृहाच्या उभारणीस विरोध झाला होता. कितीतरी वर्षे या नाटय़गृहाचे काम सुरू होते. उशिरा का होईना, हे उत्तम दर्जाचे नाटय़गृह शहरास मिळाले आहे. येथील सोयीसुविधा पाहता पालिकेने खर्चाची कोणतीही कसूर सोडली नाही. मात्र, हा डामडौल सांभाळता आला पाहिजे. शहरात चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृह, पिंपरीत संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृह अशी तीन नाटय़गृहे आहेत. यापैकी अत्रे आणि लांडगे नाटय़गृहात फारसे सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. अत्रे रंगमंदिर हे अनेक अर्थाने गैरसोयीचे आहे. तर, लांडगे नाटय़गृहावर नाटक कंपन्यांनी अघोषित बहिष्कार घातलेला आहे. तेथेही सोयीसुविधांचा अभाव आहे. चिंचवड नाटय़गृह समस्यांचे माहेरघर आहे. कार्यक्रमासाठी तारीख मिळवणे हे एक प्रकारचे दिव्य आहे. सुशोभीकरणासाठी लवकरच चिंचवड नाटय़गृह वर्षभर बंद ठेवण्यात येणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रासह अनेकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळेच पर्याय म्हणून फुले नाटय़गृहाची नितांत गरज भासणार आहे. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचे, असा अट्टहास होता म्हणून त्यांच्या धावत्या दौऱ्यात या नाटय़गृहाचे उद्घाटन झाले तेव्हा बरीच कामे अपूर्ण होती. आता ती हळूहळू मार्गी लावली जात आहे. विशेषत: ध्वनिक्षेपकांची कामे निवांतपणे पूर्ण करण्यात आली. विदेशी तंत्राचे साउंड बसवण्यात आल्याचे सांगण्यात येते. नाटय़गृह सुरू करताना निळूभाऊंविषयीचा कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. त्याआधीच नाटय़गृहाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे, पालिकेच्या अभियंत्यांनी राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त याच ठिकाणी कार्यक्रम घेतला. आता नाटय़गृह सुरू करण्यात आले असले, तरी अद्याप कर्मचारी वर्ग, व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच पुढील तारखांचे वाटप झालेले नाही. निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सवाच्या आणि इतर कार्यकमांच्या निमित्ताने प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. ‘पुन्हा सही रे सही’ नाटक झाले, तेव्हा हाऊसफुल्लचा बोर्डही नाटय़गृहात झळकला. पुढील वाटचाल करताना नियोजनाअभावी जे इतर नाटय़गृहांचे झाले, ते फुले नाटय़गृहाचे होऊ नये, त्यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा, पुढचं पाठ, मागचं सपाट ही आपली परंपरा आहेच.

‘क्लीन सिटी’चा दावा फोल

पिंपरी-चिंचवड हे ‘स्वच्छ व सुंदर’ शहर असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयात ‘कचरा फेको’ आंदोलन केले. त्यामुळे कचऱ्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. महापालिका सभेतही त्याचे पडसाद उमटले. स्वच्छ शहराचे दावे होत असले, तरी प्रत्यक्षात शहरातील कचऱ्याची समस्या उग्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. मात्र, त्याकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा परिणाम म्हणून शहरभरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून कचराकुंडय़ा ओसंडून भरून वाहत आहेत. कचरा उचलणाऱ्या गाडय़ा कमी आहेत, त्या सतत नादुरुस्त होतात, मनुष्यबळ अपुरे आहे, असे महापालिकेचे रडगाणे कायम सुरूच आहे. अशी परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांकडून शहर स्वच्छ असल्याचा दावा करत स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. महापालिका प्रशासनही नसलेले स्वच्छ शहराचे चित्र उभे करून नागरिकांची दिशाभूल करत आहे. शहरातील कचऱ्याच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने मुख्यालयात ‘कचरा फेको’ आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, कैलास जाधव, रुपेश पटेकर, बाळा दानवले, राजू सावळे, सीमा बेलापूरकर, अश्विनी बांगर, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, विशाल मानकरी यांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी करीत पोत्यात भरून आणलेला कचरा मुख्यालयात अस्ताव्यस्तपणे टाकला. सुरक्षा कर्मचारी व आंदोलकांमध्ये झटापट झाली. या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपला चांगलीच मिरची झोंबली, त्याचा परिणाम म्हणूनच या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. सभेतील चर्चेत सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचे नगरसेवक कचऱ्याच्या विषयावर तुटून पडल्याने ‘क्लीन सिटी’चा दावा फोल ठरला आहे.