पिंपरी-चिंचवड ‘बेस्ट सिटी’ म्हणून आपण मिरवतो. मात्र, कित्येक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, काही केल्या त्यांचा बंदोबस्त होत नाही, अशी कशी ‘बेस्ट सिटी’, अशी व्यथा स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आयुक्तांपुढे मांडली.
पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट जनावरे विशेषत: कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिघीत कुत्र्यांनी लहान बालकावर हल्ला चढवल्याची घटना ताजी आहे. भोसरीत मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता, अनेक नागरिकांना चावे घेतले होते. शहराच्या लौकिकाची कुत्र्यांनी अक्षरश: वाट लावली आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. मोकाट जनावरांची समस्या तर आहेच आहे. वेगाने वाढणारे शहर, बेस्ट सिटी म्हणून आपण शहराचे कौतुक करतो. मात्र, कित्येक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची समस्या भेडसावते आहे. नागरिक तक्रारी करतात, त्यावर तोडगा निघत नाही, याकडे सुनीता वाघेरे, विनायक गायकवाड, शांताराम भालेकर आदींनी आयुक्त राजीव जाधव यांचे लक्ष वेधले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर, आयुक्तांनी खासगी कंपनीचे सहकार्य घेऊन योग्य तोडगा काढू, अशी ग्वाही दिली. दरम्यान, सभेत शिलाई मशिन देण्यावरून वादळी चर्चा झाली. प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या प्रत्येक महिलेला मशिन दिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका आशा शेंडगे यांनी मांडली. मार्च २०१३ पर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या सर्वाना टप्प्याटप्प्याने शिलाई मशिन देण्यात यावे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना सभापती महेश लांडगे यांनी दिल्या. िपपरीत स्कॉय वॉक आणि भीमसृष्टीच्या कामाकडे सद्गुरू कदम यांनी लक्ष वेधले. खराळवाडी येथील खाणीचा पाण्यासाठी उपयोग करता येईल का, ते तपासावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
संगनमताने लूट
अधिकारी ठेकेदारांना सांभाळतात आणि ठेकेदार अधिकाऱ्यांना खूश ठेवतात. दोघे संगनमताने पालिकेला खड्डय़ात घालतात, अशी टीका आशा शेंडगे यांनी केली. भाडेदराने ट्रॅक्टर घेण्याचा खर्च इतका मोठा आहे की त्यात कितीतरी ट्रॅक्टर खरेदी करता येतील. असे प्रस्ताव संगनमताने आणले जातात. ही दुकानदारी थांबवावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

Story img Loader