पालिकेने लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या कलादालनात गृहोपयोगी वस्तुंचा बाजार
‘बेस्ट सिटी’ म्हणून देशभर कौतुक झालेल्या आणि वीस लाख लोकसंख्या असलेल्या िपपरी-चिंचवड शहरात एकही कलादालन नाही. गेल्या किमान २५ वर्षांत त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. सांस्कृतिक नगरी म्हणून शहराची वाटचाल सुरू असताना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय पातळीवरील अनास्था आणि स्वयंघोषित सांस्कृतिक ठेकेदारांमुळे शहरावर ही नामुष्की ओढवली आहे.
िपपरी-चिंचवड महापालिकेने बराच गाजावाजा करत कोटय़वधी रुपये खर्चून निगडीत कलादालन सुरू केले, मात्र आज त्या इमारतीचा ‘अस्तित्व मॉल’ झाला असून, बचत गटांच्या नावाखाली अनेकांची ‘दुकानदारी’ तेथे सुरू आहे. गृहोपयोगी वस्तू आणि बनियन विकण्यापर्यंतचे व्यवसाय तेथे सुरू आहेत.
पुणे शहरात अनेक कलादालने आहेत. िपपरीतील कलाकार पुण्याच्या कलादालनांवर अवलंबून असतात, मात्र तिथे तारखा मिळवण्यासाठी त्यांना झगडावे लागते. काही कलावंतांनी या विषयाचा पाठपुरावा केला. महापालिकेत बैठक झाली, शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातच कलादालन व्हावे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन, अशी कलावंतांची अपेक्षा आहे.
- चिंचवडच्या मध्यवर्ती रामकृष्ण मोरे नाटय़गृहात वाहनतळाच्या अडगळीच्या जागेत प्रदर्शने भरवली जातात. नाटय़गृहाच्या प्रवेशद्वाराजवळच मोकळय़ा जागेत चित्रे लावून प्रदर्शने झाल्याचे दाखले आहेत.
- भोसरीतील ‘बहुखर्चिक’ नाटय़गृहात बहुद्देशीय सभागृह बांधताना त्याचा वापर कलादालन म्हणून होईल, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात, तिथे लग्नाचे सोहळे होऊ लागले आहेत.
- चिंचवड गावात बसस्टॉपशेजारी धूळ खात पडलेल्या इमारतीत कलादालन करण्याचा विचार झाला, तोही मागे पडला. आता तिथे गाळे तयार करण्यात आले आहेत.
प्राधिकरण व िपपळे गुरवमध्ये नव्याने नाटय़गृह होत आहे, तेथेही कलादालनासाठी काहीतरी व्यवस्था करू, अशी भाषा सुरू आहे. प्रत्यक्षात, मागच्याच चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
कलाकार जिथे राहतो, तिथे त्याच्या कलेला दाद मिळावी, अशी त्या कलाकाराची अपेक्षा असते. श्रीमंत शहर म्हणून आपल्या शहराची ओळख सांगितली जाते, मात्र येथील कलावंतांनाच व्यासपीठ नाही. आम्ही बरेच प्रयत्न केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीच हाती आले नाही. कलावंतांची थट्टा केल्यासारखे वाटते. आम्हा सर्व कलावंतांची आग्रही मागणी आहे. शहरात सुसज्ज कलादालन असावे.
– सुधीर बांगर, चित्रकार, निगडी.