सामाजिक विषयांवर भाष्य, आकर्षक सजावटींचे भव्य रथ, ढोल-ताशांचा दणदणाट
आकर्षक सजावट असलेले भव्य रथ, सामाजिक संदेश देणारे देखावे, गुलालाचा वापर टाळून भंडाऱ्याची उधळण, स्पीकरच्या भिंती टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देणारी मंडळे असे चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी दिसून आले. पावसाने उघडीप दिल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. पिंपरी आणि चिंचवडच्या विसर्जन मार्गावरील मिरवणूक जवळपास १२ तास चालली. काळभोरनगरच्या राष्ट्रतेज मंडळाचा अपवाद वगळता वादावादीचा प्रकार घडला नाही व शांततेत मिरवणुका पार पडल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात एकच असा विसर्जन मार्ग नसल्याने ठिकठिकाणी, गावोगावी स्वतंत्रपणे विसर्जन मिरवणुका काढून मंडळे गणरायाला निरोप देतात. पिंपरीत कराची चौकातून आणि चिंचवडगावात चापेकर चौकातून जाणाऱ्या मिरवणुका लक्षवेधी असतात आणि म्हणूनच त्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन्ही ठिकाणी महापालिकेने स्वागत कक्ष उभारले होते. महापौर नितीन काळजे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह पालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी तेथे हजेरी लावली होती.
शहरात सकाळी आठपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू झाले. लहान चमूंसह वृद्ध व महिलांचा उत्साह लक्षवेधी होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने प्राधिकरणात घरच्या बाप्पांचे विसर्जन केले. सार्वजनिक मंडळे उशिराने रस्त्यावर येऊ लागली. चिंचवडला सर्वप्रथम वेताळनगरचा शिवतेज स्पोर्ट्स क्लबचा गणपती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विसर्जन मार्गावर आला. तर, पिंपरीत जेकेएल सेंटरचा गणपती दुपारी पावनेएकच्या सुमारास विसर्जनासाठी आला. दोन्ही ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत मंडळे विसर्जनासाठी येत होती. दोन्हीकडे सुरुवातीचा काही काळ संथपणा जाणवत होता. चिंचवडला सायंकाळी सहा वाजल्यानंतर विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, विसर्जनासाठी मंडळे येत नव्हती व रांगा बिलकूल नव्हत्या. दोन मंडळांमध्ये बरेच अंतर पडत होते. सायंकाळी सहापर्यंत जेमतेम १५ मंडळे तर रात्री नऊपर्यंत अवघी २२ मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ झाली होती. रात्री आठ ते नऊच्या दरम्यान व्यासपीठावरील पाहुणे मंडळांची वाट पाहताना दिसत होते. पिंपरीतही थोडय़ाफार फरकाने अशीच परिस्थिती होती. आकुर्डी काळभोरनगरचे राष्ट्रतेज मंडळ व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.
बहुतांश सर्वच मंडळांच्या मिरवणुकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यंदा गुलालाचा वापर जवळपास झालाच नाही. मंडळांनी भंडाऱ्याचा पर्याय निवडला होता. त्याचप्रमाणे, डॉल्बीलाही फाटा देऊन पारंपरिक वाद्यांना मंडळांनी पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा दणदणाट होत होता. विसर्जन मार्गासह चौकाचौकात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीसाठी कार्यरत होते. रात्री बाराच्या सुमारास पालिकेने स्वागत कक्ष बंद केले. रात्री बारानंतर विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांचे ध्वनिक्षेपक पोलिसांनी सरसकट बंद केले. पिंपरी-चिंचवड शहरात २३ हजार ३५० घरगुती व ६२९ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चिंचवडला स्मशानभूमी कधी होणार?
विसर्जन मिरवणुकीत आकर्षक सजावटी करण्याबरोबरच मंडळांनी सामाजिक विषयांवर सूचक भाष्य करण्याची परंपरा जपली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कोपर्डीतील घटनेचे पडसाद उमटले होते. त्याआधी चापेकर बंधूंच्या स्मारकाचा विषयही मांडण्यात आला होता. ती परंपरा कायम ठेवून यंदा चिंचवडकरांना भेडसावणाऱ्या स्मशानभूमीच्या विषयाकडे मयूरेश मित्र मंडळाने लक्ष वेधले. चिंचवडवासीयांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती. असे फलक मंडळाने ठळकपणे दाखवले. पालिकेच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. नेहरूनगरच्या राष्ट्रतेज मंडळाच्या वतीने ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ याविषयी जागृतीपर देखावा सादर करण्यात आला. तर, सेव्हन स्टार मंडळाने देहदानाचा संदेश दिला होता. पिंपरीतील लाल बहादूर भाजीमंडई मंडळाच्या शिस्तबद्ध पथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
भोसरीत ढोल ताशांचा दणदणाट
उत्कृष्ट देखाव्यांची परंपरा असलेल्या भोसरीतील गणेश मंडळांनी आकर्षक मिरवणुकांची परंपराही कायम ठेवली. गुलाल टाळून भंडाऱ्याची उधळण करत ढोल-ताशांच्या दणदणाटात सोमवारी मंडळांनी विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची भोसरीतील मंडळांची परंपरा आहे. त्यानुसार, भोसरी गावठाणातील बापुजीबुवा चौकातून विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. खऱ्या अर्थाने सायंकाळी चारपासून वातावरणात रंग भरू लागला. अंकुशराव लांडगे नाटय़गृहासमोरील मैदानात महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी दोन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. पीसीएमसी चौकात स्वागत कक्षही उभारण्यात आला होता. प्रभाग समिती अध्यक्ष भीमाबाई फुगे, प्रभाग अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी मंडळांचे स्वागत केले. मंडळांनी पुष्परथ, मत्स्यमहाल, विद्युत महाल, गजराज रथ, मयूररथ, फुलांचा रथ, विद्युत रोषणाई आदींच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. जवळपास सर्वच प्रमुख मंडळांनी गुलालाचा वापर केला नाही. त्याऐवजी भंडाऱ्याचा पर्याय निवडला. विसर्जन मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. दोरखंड व मल्लखांबांच्या कसरतींनी नागरिकांना खिळवून ठेवले होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.